पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
अवैधरित्या वाळू उपसा आणि वाहतूक करणार्या वाळू माफियाविरूध्द स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पारनेर तालुक्यातील खडकवाडी परिसरात सापळा रचून एक विनानंबरचा डंपर आणि चार ब्रास वाळू असा एकूण 15 लाख 40 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक करणार्यांविरूध्द कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.
त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार संतोष खैरे, गणेश लोंढे, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव, योगेश कर्डिले, अरूण मोरे यांचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने पारनेर तालुक्यात माहितीच्या आधारे गवळीबाबा माथा, खडकवाडी शिवार परिसरात सापळा रचला. दरम्यान, एका विनानंबर डंपरमधून वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने तत्काळ कारवाई करून ट्रक थांबवला. तपासणीअंती वाहनाच्या हौद्यात वाळू भरलेली आढळली.
वाहनचालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव सुनील बबन केदार (वय 30, रा. खडकवाडी) असे सांगितले. पथकाने त्याच्याकडून वाळू व डंपर असा एकूण 15 लाख 40 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. अंमलदार कर्डिले यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




