Sunday, May 26, 2024
Homeनगरवाळूतस्करांची तलाठ्याला मारहाण

वाळूतस्करांची तलाठ्याला मारहाण

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील जेऊर कुंभारी येथे अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर पकडून कारवाईसाठी तहसील कार्यालयात नेत असताना वाळू तस्करांनी रस्त्यात डंपर अडवून तलाठी प्रवीण शेषराव डहाके यांना मारहाण करून डंपर पळवून नेला. तलाठी डहाके यांनी आरोपी राजू शेख उर्फ राजा महंमद शेख सह इतर तीन अनोळखी इसमांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी सहा वाजता घडली.

- Advertisement -

अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना मिळाली. त्यानुसार भोसले यांनी महसूलचे पथक तयार केले. वाळू वाहतूक करणारा विना नंबरचा डंपर पथकाने पकडला. या डंपरमधून अवैध वाळू वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले.

त्याच्यावर कारवाई करून तो डंपर तहसील कार्यालयात घेऊन जात असताना जेऊर कुंभारी शिवारात एका चारचाकी गाडीतून आरोपी राजू शेख व इतरांनी डंपर अडवला. तलाठी डहाके यांच्या हाताला धरून डंपर मधून खाली ओढले. जर माझ्यावर कारवाई केली तर मी तुम्हाला लाच मागितल्याच्या कारणावरून अडकविल, अशी धमकी दिली. सोबत असलेल्या इसमांनी डहाके यांना मारहाण केली व डंपर मधली वाळू रस्त्यावर ओतून सदरचा डंपर पळवून नेला.

या आशयाची फिर्याद तलाठी डहाके यांनी शहर पोलिसांत दिली आहे. यावरून शहर पोलीस ठाण्यात राजू शेख व इतर तीन अनोळखी विरुद्ध गुरनं 516/2023 नुसार भादवि.कलम 353, 332, 379, 143, 147, 149, 506, सह कलम पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 3 व 15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भरत दाते करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या