Saturday, May 25, 2024
Homeनगरवाळूतस्करीच्या टेम्पोची माहिती दिल्याने ग्रामपंचायत कर्मचार्‍यास धमकी

वाळूतस्करीच्या टेम्पोची माहिती दिल्याने ग्रामपंचायत कर्मचार्‍यास धमकी

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

वाळूतस्करीच्या टेम्पोची माहिती दिल्याने कारवाई झाल्याच्या कारणाने ग्रामपंचायत कर्मचार्‍याच्या घरी जावून तलवार दाखवून धमकी दिली. ही घटना नेवासा तालुक्यातील पुनतगाव येथे घडली असून संबंधीत व्यक्तीवर कारवाई करावी यासाठी पुनतगाव ग्रामस्थांनी काल सुरु केलेले उपोषण तहसीलदारांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.

- Advertisement -

गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास चॉकलेटी रंगाचा विना नंबर क्रमांकाच्या टेम्पो वाळूतस्करी करीत असल्याची महसुल विभागाला माहिती मिळाली. त्या अनुषंगाने स्वतः तहसीलदार, पुनतगावाचे तलाठी राहुल साठे यांच्या महसुल कर्मचार्‍यांनी वाळूतस्करी करणारा टेम्पो मुद्देमालासहित पकडला. पुढील कारवाईसाठी टेम्पो ताब्यात घेतला. त्यात सुमारे दोन ते अडीच ब्रास वाळू असल्याची माहिती महसुल विभागाकडून देण्यात आली. टेम्पोसह 1 लाख चाळीस हजार रुपयांची वाळू जप्त करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

ग्रामपंचायत कर्मचारी बापूसाहेब लांडगे यांनी माहिती दिल्याचा राग मनात धरून वाळूतस्करांनी शुक्रवारी दुपारी लांडगे यांना फोनवरून धमकावले. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा लांडगे यांच्या गावात येऊन त्यांच्या घरी जाऊन तलवारी सारख्या धारदार शस्त्राने धमकावले. गावात भीतीचे वातावरण निर्माण करण्यात आल्याचे निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे.

ग्रामस्थांनी शनिवारी सकाळी आठ वाजता उपोषण सुरू केले होते.नेवासा पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे, नेवासा तहसीलदार संजय बिराजदार यांना निवेदनाद्वारे आमच्या जीवितास धोका असून आमचे जर काही बरेवाईट झाले तर तुम्ही जबाबदार राहणार असल्याचे देखील निवेदनात म्हटले आहे.

उपोषणावेळी पुनतगाव ग्रामपंचायतीचे सुदर्शन वाकचौरे, उपसरपंच सोमनाथ बर्डे, माजी सरपंच साहेबराव पवार, सोसायटीचे माजी अध्यक्ष नामदेव पवार, तंटामुक्ती अध्यक्ष नानाभाऊ वरुडे, विलास वाकचौरे, हिरालाल वाघमारे, सुधाकर पवार, विठ्ठल पवार, राजेंद्र शिंदे, बाळासाहेब वाकचौरे, अशोक वाकचौरे, आशपक देशमुख, बाळासाहेब तागड, सुरेश पागिरे, अनिल वाकचौरे, नानासाहेब वाकचौरे, सतीश वरुडे, नाना घोलप, अशोक कारखान्याचे संचालक बाळासाहेब शिंदे, पाचेगावचे माजी सरपंच दिगंबर नांदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

आतापर्यंत आमच्या पुनतगावाने महसूल व पोलीस प्रशासनाला वाळूतस्करी रोखण्यासाठी मोलाचे सहकार्य केलेले आहे. वाळूतस्करांचे तराफे पेटवून देण्यासाठी गावाने एकजुटीने मदत केली. वाळूतस्करांची वाहने पकडून देण्यासाठी मोलाची साथ दिली. पण ग्रामस्थांना जर वाळूतस्करांकडून धमकावले जात असेल तर गावाने महसुल व पोलीस प्रशासनाला मदत करावी की नाही? असा प्रश्न गावकर्‍यांना पडला आहे. आम्ही वाळू रोखण्यासाठी तुम्हाला मदत करायची आणि तुम्ही मात्र त्यांच्यावर कारवाई न करता त्याची साधने सोडून द्यायची का? त्यामुळे त्या वाळूतस्करी करणार्‍यांची मजल वाढून ग्रामस्थांना धमकावले जात आहे. ग्रामस्थ वाळू रोखण्यासाठी मदत करतात तसे महसूल व पोलीस प्रशासनाने देखील ग्रामस्थांना मदत करायला पाहिजे.

– सुदर्शन वाकचौरे, सरपंच पुनतगाव

उपोषणकर्त्यांशी तहसीलदारांची चर्चा

वाळूउपसा करणार्‍या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याची भूमिका महसूलची राहणार आहे. तसेच ज्या ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना धमकी दिली आहे. त्या व्यक्तीने कायदेशीर गुन्हा दाखल करावा असे तहसीलदार यांनी स्पष्ट केले. उपोषणकर्त्यांनी महसुल व पोलीस अधिकार्‍यांनी त्या वाळूतस्करांना समज देण्यात यावी अशी मागणी केली. आम्हाला दैनंदिन व्यवहाराच्या कामासाठी नेवाशाला जाणे-येणे आहे, त्यामुळे आमच्या जीवितास धोका आहे. तहसीलदार संजय बिरादार, पोलीस उपनिरीक्षक श्री. आहिरे यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी पाचेगाव बिट हवालदार विठ्ठल गायकवाड उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या