Tuesday, March 25, 2025
Homeनगरकोल्हार भगवतीपूरमध्ये बोकाळलेल्या वाळूतस्करीचा प्रश्न ऐरणीवर

कोल्हार भगवतीपूरमध्ये बोकाळलेल्या वाळूतस्करीचा प्रश्न ऐरणीवर

कोल्हार | Kolhar

वाळूतस्करीच्या मुद्यावरून कोल्हार भगवतीपूरचे प्रवरा नदीपात्र पुन्हा चर्चेत आले. बुधवारी नदीच्या पाण्यात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. बेकायदेशीरपणे बेसुमार वाळू उपसल्याने नदीपात्रात मोठमोठ्या आकाराचे खड्डे झाले. या खड्ड्यात खोल बुडाल्यानेच सदर मुलाला जीव गमवावा लागला. गरीब घरातला हा शालेय मुलगा वाळू तस्करीचा बळी ठरला.
कोल्हार बुद्रुक येथे बागमळा शिवारात प्रवरा नदीपात्रात पोहायला गेलेला अविनाश पाराजी जोगदंड हा 15 वर्षीय शाळकरी मुलगा पुन्हा घरी परतलाच नाही. नदीपात्रातील खड्ड्यांमध्ये अडकल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाला. आपत्कालीन बचाव पथकाच्या तब्बल तीन तासांच्या शर्थीच्या शोधकार्यानंतर त्याचा मृतदेह हाती लागला. या घटनेमुळे कोल्हार बुद्रुक, भगवतीपूर आणि राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द या गावातील बोकाळलेल्या वाळूतस्करीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

- Advertisement -

सदर घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. नदीत मुलगा बुडाल्याच्या घटनेच्या अनुषंगाने बुधवारी दिवसभर सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा सुरू होती. सुजाण नागरिकांनी वाळूतस्करी आणि त्यास आश्रय देणार्‍या घटकांबद्दल तीव्र शब्दांत चीड व्यक्त केली. या राजरोसपणे सुरू असलेल्या वाळू तस्करीबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. वाळूतस्करीला राजाश्रय लाभल्याचे सर्वश्रुत आहे. त्याचप्रमाणे महसूल विभागाचे अधिकारी आणि पोलिसांशी असलेले लागेबांधे यामुळे वाळूतस्करांना अभय मिळत आहे. प्रश्न गंभीर बनलेला आहे. सर्वसामान्य नागरिकांना हे सर्व उघड्या डोळ्यांनी बघावे लागते. दुर्दैव हे आहे की, ज्यांच्याकडून या गोष्टींना पायबंद घालायला पाहिजे तीच मंडळी यात सामील असल्याचे दुर्दैवी चित्र पाहायला मिळते.

अवैध वाळू उपशाची समस्या ही तशी जुनीच आहे. दिवसेंदिवस या समस्येने उग्र रूप घेऊन त्याचा अजगर बनला आहे. राजकारण आणि अर्थकारण या दोन्ही कारणांमुळे विनाकारण सर्वसामान्यांना हा त्रास भोगावा लागत आहे. अनधिकृतपणे होणारा वाळू उपसा हा पर्यावरणासाठी जसा घातक आहे तसाच तो नदीकाठच्या शेतीला दूरगामी विपरीत परिणाम करणारा ठरतो हे सर्वज्ञात आहे. वाळू तस्करीतून वाढलेली दादागिरी, गुंडगिरी ही सामाजिक शांतता भंग करते आहे. वाळू तस्करीच्या कारणातून होणारे सरकारी अधिकार्‍यांवरील हल्ले आणि नागरिकांवरील मग्रुरी या गोष्टी समाजासाठी घातक आहेत. अशा असंख्य घटना आजपर्यंत सर्वत्र पाहायला मिळाल्या आहेत.

आम्हाला आमक्या- आमक्या राजकीय नेत्याचा आशीर्वाद आहे. आमचे महसूल अधिकारी आणि पोलिसांशी रोजचेच देण्याघेण्याचे व्यवहार आहेत. त्यामुळे आम्हाला अभय आहे. अशा प्रकारच्या वल्गना अगदी उघडपणे आणि बेधडकपणे वाळू तस्करांकडून केल्या जातात हे विशेष. मध्यंतरी बंधारे भरण्यासाठी नदीला पाणी सोडले होते. सध्या ते नदीपात्रात पाणी अडलेले आहे. नदीमध्ये पाणी असतानादेखील बोटीच्या सहाय्याने तसेच वेगवेगळ्या शक्कल लढवून बेसुमार वाळूउपसा केला जात आहे. आणि ही बाब लपून राहिलेली देखील नाही. असे हे उघड सत्य असताना यावर प्रतिबंध घातला न गेल्यास जनक्षोभ उसळल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचे दूरगामी परिणाम प्रशासकीय अधिकार्‍यांना भोगावे लागतील हे निश्चित.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : जयकुमार गोरे प्रकरणावरून सुप्रिया सुळे आणि रोहित...

0
मुंबई | Mumbai राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यावर एका महिलेने (Woman) आरोप करत त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी सदर महिलेला...