तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे गावांतर्गतच्या जुनेगाव खळवाडी येथील लोकवस्तीतून रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरासमोरील चंदनाच्या झाडाची चोरी केली. झाड खोडासह कापून चोरटे पसार झाले. शनिवारी (दि. 5) रात्रीच्या सुमारास ही चंदन चोरीची घटना घडली. यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
जुनेगाव खळवाडी परिसरातील बबन गंगाधर दिघे यांच्या घरासमोर तब्बल 20 वर्षे जुने चंदनाचे झाड होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरी येत सदर चंदनाचे झाड विकायचे आहे का? अशी चौकशी काही व्यक्तींनी केली होती. दरम्यान त्यांच्या घरात मुलीचे लग्न असल्याने नंतर बघू असे बबन दिघे यांनी सदर व्यक्तींना सांगितले होते. मात्र शुक्रवार व शनिवार दरम्यान रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चंदनाचे झाड करवतीच्या साहाय्याने कापून नेले. खोडाच्या तळापासून ते दहा फूट उंचीपर्यंत चंदनाचे लाकूड चोरट्यांनी लंपास केले.
किरकोळ फांद्या आणि हिरवा पाला तेवढा शिल्लक ठेवला. चोरट्यांनी बेमालूमपणे चंदनाच्या झाडाची चोरी केली आणि पसार झाले. दरम्यान शनिवारी सकाळी बबन दिघे हे झोपेतून उठल्यानंतर चोरीचा सदर प्रकार त्यांच्या लक्षात आला. सदर घटनेने तळेगाव परिसरात चंदन चोर सक्रीय असल्याचे उघड झाले आहे. घरासमोरील चंदनाच्या झाडाची चोरी करण्याचा प्रकार घडल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.