नागपूर । Nagpur
राज्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश संपादन केले आहे. सध्या मुंबईसह राज्यातील २३ महानगरपालिकांमध्ये महापौरपदी कोणाची वर्णी लावायची, याबाबत पक्षांतर्गत खलबते सुरू असतानाच नागपूरच्या राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे आमदार आणि माजी महापौर संदीप जोशी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. संदीप जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक भावनिक पत्र लिहिले असून ‘आता मला थांबायचंय!’ अशा मथळ्याखाली आपल्या मनातील खंत बोलून दाखवली आहे. या पत्रात त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीला पूर्णविराम देण्यामागची कारणे स्पष्ट केली आहेत. सध्याच्या राजकारणात सत्तेसाठी सुरू असलेले पक्षांतर, वाढलेला संधीसाधूपणा आणि स्पर्धा यांवर त्यांनी थेट बोट ठेवले आहे.
संदीप जोशी यांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?
नमस्कार,
हे पत्र लिहिण्याचा निर्णय सहज घेतलेला नाही. राजकारण ही माझ्यासाठी नेहमीच पद किंवा प्रतिष्ठेपेक्षा वेगळी, समाजसेवेची आणि निष्ठेची वाट होती. मात्र आज सत्तेसाठी सुरु असलेले पक्षांतर, संधीसाधूपणा आणि वाढलेली स्पर्धा सामान्य मतदारांसह निष्ठावान कार्यकर्त्यांनाही अस्वस्थ करत आहे. मर्यादित जागा आणि वाढलेल्या अपेक्षांमुळे कुणीच थांबायला तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आजही मी स्वतःला भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता मानतो, पण हे चित्र पाहता आता आपणच थांबावे, असा विचार मनात पक्का होत गेला आहे… आणि तोच निर्णय या पत्रातून मांडत आहे.
मी आता 55 वर्षांचा झालो आहे. स्वतःची जागा रिक्त करणं आणि तरुण रक्ताला समोर जाऊ देणं हे सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे माझ्या पुढील राजकीय वाटचालीला मी पूर्ण विचारांती पूर्णविराम देत आहे. पक्षाने मला मोठे केले याची मला जाणीव आहे. त्यामुळे या पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व खासदार नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माफी मागून मी आज हा निर्णय जाहीर करीत आहे.
माझ्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाची मुदत, अर्थात आमदारकी, 13 मे रोजी संपुष्टात येत आहे. ही मुदत पक्षाने दिलेली जबाबदारी समजून मी पूर्ण करणार आहे. आमदार म्हणून माझ्यावर असलेली सर्व घटनात्मक, नैतिक आणि सार्वजनिक कर्तव्ये मी पूर्ण जबाबदारीने पार पाडेन. 13 मे नंतर पक्षाला मी आमदारकी मागणार नाही किंवा पक्षाने दिली तरी नम्रपणे त्यास नकार देईन. एखाद्या सामान्य, तरुण कार्यकर्त्याला अथवा पक्ष निर्णय घेईल त्या व्यक्तीला ती द्यावी. 13 मे नंतर मी पूर्णपणे सक्रीय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेत आहे. हा निर्णय कोणत्याही क्षणिक भावनेतून नाही, तर सखोल विचारांती घेतलेला आहे. यापुढे मी सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ता म्हणून आयुष्य जगेन आणि सर्वसामान्यांची सेवा आणि त्यांच्यासाठी कार्य करत राहीन.
राजकारणातून निवृत्त होण्याचा हा निर्णय माझ्या कुटुंबासाठी, माझ्यावर प्रेम करणाऱ्या स्नेहीजनांसाठी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी धक्का देणारा आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. या सर्वांची मी मनापासून माफी मागतो आणि अत्यंत नम्रपणे हा निर्णय जाहीर करतो.

संदीप जोशी हे नागपूरमधील भाजपचे एक वजनदार नाव आहे. त्यांनी महापौर म्हणून शहराच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू सहकाऱ्याने अशा प्रकारे अचानक निवृत्ती जाहीर केल्यामुळे भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. जोशी यांच्या या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत असून, आगामी काळात नागपूर भाजपमध्ये याचे काय पडसाद उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संदीप जोशी यांच्या या निर्णयामुळे निष्ठा आणि सत्तेचे राजकारण यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, फडणवीस आता यावर काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.




