नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पुण्याचे सहआयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्त पदाचा पदभार तत्कालीन आयुक्त अंकुश शिंदे (Ankush Shinde) यांच्याकडून स्वीकारला. सर्वप्रथम त्यांनी नाशिकचे ग्रामदैवत कालिका मंदिरात जाऊन दर्शन घेत आयुक्तालयात प्रवेश केला.
यावेळी माध्यमांशी संवाद साधतांना नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले की, तत्कालीन आयुक्त अंकुश शिंदे यांनी नाशकात चांगले काम केले आहे. नाशकात वाहतुकीसह कायदा आणि सुव्यवस्थेचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांशी चर्चा करून पाऊले उचलले जातील. आगामी लोकसभा व विधानसभा तसेच अन्य निवडणुका आणि राजकीय घडामोडी बघता आवश्यक ती पावले उचलली जातील.
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता वेळ पडल्यास कठोर पाऊलेदेखील उचलले जातील. यावेळी त्यांनी महिला सुरक्षेकडे विशेष लक्ष देऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे सांगितले. कर्णिक यांनी पुण्यात असताना नागरिकांचा थेट पोलीस आयुक्तांशी संवाद व्हावा याकरिता व्हाट्सअप नंबर जारी केला होता. त्याच पार्श्वभूमीवर नाशिकमधील नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप नंबर जारी करण्याबाबत विचाराधीन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यासोबतच बाल गुन्हेगारी व रस्त्यावरील हिंसाचार रोखण्याकरिता अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवण्याचे ते म्हणाले. यावेळी उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, उपायुक्त प्रशासन चंद्रकांत खांडवी, उपायुक्त परिमंडळ १ किरणकुमार चव्हाण, उपायुक्त परिमंडळ २ मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त गुन्हे सिताराम कोल्हे उपस्थित होते.