अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
कोणी पुढे जात असेल तर त्याला मागे ओढण्याचा प्रयत्न केला जातो. तसाच प्रयत्न माझ्याबाबतीतही करण्यात येत आहे. पण आता मी थांबणार नाही आणि मागे हटणार नाही. नगरकरांना दिलेला शब्द, शहर विकासाचे पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मागे हटणार नाही, अशा आशयाची माजी महापौर संदीप कोतकर यांची सोशल मीडियावरील पोस्ट मंगळवारी शहरभर जोरात व्हायरल झाली. शहराच्या विकासावर आपण नंतर बोलूच….! सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नही…लवकरच भेटूयात…अशी या पोस्टमधील पुढील शब्दही चर्चेत आहेत.
नगर शहर विधानसभा मतदार संघात माजी महापौर कोतकर उभे राहणार असल्याची चर्चा आहे. यादृष्टीने त्यांनी नुकत्याच झालेल्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत तब्बल आठ वर्षांनी स्पंदन प्रतिष्ठान मंडळाचा गणपतीही आणला व त्यानिमित्ताने जोरदार शक्ती प्रदर्शनही केले. या पार्श्वभूमीवर काल, मंगळवारी त्यांची फेसबुक पोस्ट शहरभर व्हायरल झाली व त्यावरही भाष्य होताना कोतकर जर नगरच्या मैदानात उतरले तर काय होईल, याचीही चर्चा रंगू लागली आहे. माजी महापौर कोतकरांनी या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, अनेक दिवसांपासून मी माझ्या वैयक्तिक अडचणींमुळे आपल्याशी हितगुज करू शकलो नाही. परंतु आता वेळ आलीय बोलायची… म्हणून आपल्याशी हितगुज करतोय… नगर शहर विकसित व्हावं, शहराचे रूपडे बदलावे हे स्वप्न मी पाहिलं. महापौर पदाच्या काळात केडगाववासियांचा अत्यंत जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न, केडगाव पाणीपुरवठा योजना, शहर पाणी योजना, शहरातील रस्ते, आरोग्य सेवा आणि इतर नागरी सुविधांमध्ये सुधारणा करण्यात आपल्या पाठबळामुळे काही प्रमाणात का होईना यश आले.
याचे साक्षीदार तुम्ही आहातच. अजूनही नगर शहरात विकासाची कामे करण्याजोगे खूप काही आहे. तरुणांच्या हाताला रोजगार, महिलांची सुरक्षितता, शिक्षणासाठी सोयी सुविधा, पाणी, आरोग्य, उच्च शिक्षण, एमआयडीसी उद्योगधंदे यावर काम करणं मला आवश्यक वाटतं. नगर शहर विकसित व्हावं यासाठी मनापासून खूणगाठ बांधलीय. पण नगर शहराच्या बाबतीत पाहिलेलं स्वप्न काहीसं मागे पडलंय. आपल्याशी हितगूज करताना मनाला खूप वेदना होत आहेत. पण आपल्या नगर शहराला पुणे, नाशिकच्या बरोबरीने का होईना न्यायचेय, ही मनोमन इच्छा आहेच, असे यात आवर्जून नमूद केले आहे. महापौर पदाच्या काळात शहराच्या विकासासाठी नगरकरांनो आपण मला लाख मोलाची साथ दिली. तुम्ही दिलेली साथ माझ्या आयुष्यात विसरणं कदापिही शक्य नाही.
नगरकरांशी जोडलेली माझी नाळ आजही कायम आहे. त्यात थोडासाही बदल झालेला नाही आणि होणारही नाही. गणपती विसर्जनाच्यावेळी माझ्या एका आवाहनावर तुम्ही हजारोंच्या संख्येने स्पंदन प्रतिष्ठानच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला आणि गणपती बाप्पाच्या ऐतिहासिक मिरवणुकीचे साक्षीदार झालात. हीच गणपती विसर्जनाची भव्य मिरवणूक नगर शहराला वेगळी दिशा देणारी ठरणार असल्याचे त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.