Saturday, July 27, 2024
Homeनगरकारागृहातील मैत्री आली पळून जाण्याच्या मदतीला

कारागृहातील मैत्री आली पळून जाण्याच्या मदतीला

अहमदनगर (प्रतिनिधी)

पूर्वी कारागृहात असलेल्या आरोपी सोबत झालेली मैत्री संगमनेर उपकारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीतून पळून गेलेल्या चार आरोपींना मदतीला आली. कारागृहात बसवलेल्या कुलरच्या आवाजाचा फायदा घेऊन मागील महिनाभरापासून कारागृहाचे गज व्हेक्सा ब्लेडने कापण्याचा उद्योग केला आणि बुधवारी (दि. 8) सकाळी पावणे सातच्या सुमारास चौघांनी कारागृहातून धूम ठोकली. मात्र त्यांची ही धूम स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये रोखली. त्या चौघांसह त्यांना पळून जाण्यास मदत करणार्‍या दोघांना ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. त्याची माहिती शुक्रवारी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी माध्यमांना दिली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

- Advertisement -

एलसीबी पथकाने कारागृहातून पळालेल्या राहुल देवीदास काळे, रोशन रमेश ददेल ऊर्फ थापा, आनंद छबु ढाले, मच्छिंद्र मनाजी जाधव यांच्यासह त्यांना वाहनातून पळवून नेणारे अल्ताफ आसिफ शेख (वय 27 रा. तावडे वस्ती, पुणे, हल्ली रा. कुरण, ता. संगमनेर) व मोहनलाल नेताजी भाटी (वय 47 रा. वडगाव शेरी, पुणे) यांना अटक केली आहे. उपकारागृहाचे तीन गज कापून चारचाकीतून चौघे पळून गेले होते. पोलिसांची पाच पथके त्यांचा शोध घेत होती. तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज व खबर्‍यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांचा माग काढला व गुरूवारी सकाळी आंघोळीच्या तयारीत असलेल्या चार आरोपींसह त्यांना मदत करणार्‍या दोघाजणांना जामनेर येथे वाहनासह ताब्यात घेतले. त्यांना ताब्यात घेतल्यानतर त्यांनी याबाबत पोलिसांसमोर उलगडा केला आहे. अनैसर्गिक कृत्याच्या गुन्ह्यात पूर्वी अल्ताफ आसिफ शेख उपकारागृहात होता. त्यावेळी त्याची मैत्री राहुल काळे याच्याशी झाली होती. काळे याने कारागृहातून पळून जाण्याचा प्लॅन अल्ताफ सोबत आखला होता. अल्ताफ बाहेर येताच तो पुण्यातील चारचाकी वाहनावर चालक म्हणून काम करू लागला. त्याच वाहनावर मोहनलाल भाटी हा देखील चालक म्हणून होता. काळे हा कारागृहात वापर असलेल्या मोबाईलवरून अल्ताफच्या संपर्कात होता. त्यातूनच त्यांनी पळून जाण्याचा प्लॅन तयार केला व 8 नोव्हेंबर रोजी धूम ठोकली. कारागृहातून बाहेर पडल्यावर गाडीतून हे सहाजण नाशिक, धुळे, मालेगावला गेले. तेथे कपडे बदलून व जेवण करून जळगाव-जामनेरकडे गेले व तेथे आंघोळ करताना त्यांना पोलिसांनी पकडले.

कारागृहात गावठी कट्टे, मोबाईल

उपकारागृहातून पळालेल्या आरोपींकडे एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतुसे व सहा मोबाईल आढळून आले आहेत. तहसीलदार यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या उपकारागृहाची सुरक्षाव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असल्याचे दिसून येते. आरोपींना थेट कट्टा, मोबाईल यासह गज कापण्यासाठी व्हेक्सा ब्लेड आणि व्यसन करण्यासाठी गुटखा पोहच केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. येवढ्या मोठ्या प्रमाणत या वस्तू कारागृहात जात असल्याने त्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश अधीक्षक ओला यांनी दिले आहेत.

गंभीर दुखापत करण्याचा प्लॅन

काळे व इतरांनी कोणत्याही परिस्थितीत कारागृह सोडण्याचा चंग मनाशी बांधला होता. बराखीमध्ये एकुण 14 जण होते. परंतू पळून जाण्यासाठी चार जणच तयार झाले. कारागृहाचे कापलेले गज घेऊन जाताना कोणी अडवले तर त्याला त्याच गजाने दुखापत करण्याचे त्यांनी नियोजन केले होते व त्याच उद्देशाने त्यांनी पळून जाताना एका होमगार्डशी त्यांची झटापट झाली व त्याच्यावर त्यांनी हल्ल्याचा प्रयत्नही केला. त्यामुळे गुन्ह्यात वाढीव खूनाचा प्रयत्न, कटकारस्थानचे कलम लावण्यात आले आहे.

तांत्रिक कौशल्य आणि नागरिकांची साथ

एलसीबी पथकाने तांत्रिक कौशल्याच्या आधारे माग काढला. माग काढत असताना त्यांना नाशिक, धुळे, मालेगाव व जळगाव जिल्ह्यात नागरिकांनी चांगली मदत केली. धुळ्यात एका चहाच्या टपरीवर आरोपी थांबले होते. त्याच्या मोबईलवरून त्यांनी जामनेरला ज्या शेतात थांबले होते, त्या शेताच्या मालकाला फोन केला होता व त्याच्याकडूनच खर्चासाठी दोन हजार रूपयेही घेतले होते, त्यामुळेच पोलिसांना आरोपींना पकडण्याचा मार्ग सापडला.

- Advertisment -

ताज्या बातम्या