अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत संगमनेरातील अमृतनगर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालय येथे नवीन कायमस्वरुपी विनाअनुदानित कृषी महाविद्यालय सुरू करण्यास अटींवर मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर आता डॉ.राधेशाम शिवराम गुंजाळ वेल्फेअर फाउंंडेशन, चंदनापुरी घाट, गुंजाळवाडी ता.संगमनेर, जि.अहमदनगर या संस्थेच्या कायमस्वरुपी विना अनुदानित कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे रुपांतरण करुन कृषी महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्याला आता दोन कायमस्वरुपी विना अनुदानित कृषी महाविद्यालयेे मिळाले आहेत.
चंदनापुरी घाट येथील नवीन कृषी महाविद्यालयात 60 विद्यार्थ्यांना प्रतीवर्षी प्रवेश मिळणार आहे. या नवीन महाविद्यालयांना विद्यापीठ तपासणी समितीच्या अहवालातील निष्कर्षात नमूद बाबींची पूर्तता करावी लागणार आहे.शिक्षण पदवी अभ्यासक्रमाची शुल्क निश्चिती शुल्क नियामक प्राधिकरण तसेच शासनाने वेळोवेळी निर्देशित केलेल्या प्राधिकरणामार्फत विहीत करण्यात येतील. तसेच राज्य शासनाने वेळोवेळी निश्चित केेलेली मार्गदर्शक तत्वे व निकष खाजगी विना अनुदानित पदवी अभ्यासक्रमासाठ लागू राहतील.या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सन 2023-24 पासून सुरू होत आहे.