संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
शहरातील मौलाना आझाद मंगल कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस रहेमतनगर येथे गोमांस भरलेली दोन वाहने उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या पथकाने शनिवारी (दि.11) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास पकडले आहेत. या कारवाईत तब्बल अडीच हजार किलो गोमांस, दोन वाहने असा एकूण 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत तिघांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांना गुप्त बातमीदाराकडून रहेमतनगर येथे मोहमंद अतीक रफीक कुरेशी उर्फ सोन्या याच्या मालकीचे दोन वाहनांमध्ये गोमांस भरलेले आहे. तेथे तत्काळ जावून कारवाई करा, अशी सूचना त्यांनी पथकाला दिली. त्यानुसार पथकातील पोहेकॉ. दत्तात्रेय मेंगाळ, अनिल कडलग, पोना. बापूसाहेब हांडे आणि पोकॉ. राहुल सारबंदे हे वरील घटनास्थळी गेले असता तेथे दोन वाहने (क्र.एमएच.17, बीवाय.8580 व एमएच.48, सीबी.8821) दिसून आली.
पोलीस आल्याचे पाहून तिघेजण पळून जावू लागले. तेवढ्यात अल्ताफ इसाक सलीम शेख (रा. नाटकी, संगमनेर) यास पकडले. त्याला पळून गेलेल्यांची नावे विचारली असता मोहमंद अतीक रफीक कुरेशी आणि अरबाज सादिक शेख (रा. रहेमतनर, संगमनेर) अशी सांगितली. सदर गोमांस आणि वाहनांबाबत अल्ताफ शेख याच्याकडे विचारपूस केली असता त्याने 8821 क्रमांकाचे वाहन माझ्या मालकीचे आणि 8580 क्रमांकाचे वाहन पळून गेलेला अरबाज शेख याच्या मालकीचे असल्याचे सांगितले. तर गोमांस मोहमंद कुरेशी उर्फ सोन्या याच्या मालकीचे असल्याचे सांगितले.
या कारवाईत 6 लाख 50 हजार रुपयांची पिकअप, 3 लाख रुपयांचे 1500 किलो गोमांस, 5 लाख 50 हजार रुपयांचे वाहन, 2 लाख रुपयांचे 1000 किलो गोमांस असा एकूण 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोकॉ. राहुल सारबंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी वरील तिघांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.




