संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
संगमनेर शहरापासून केवळ हाकेच्या अंतरावर असलेल्या सुकेवाडी शिवारात गुरुवारी (दि. ११ डिसेंबर) सकाळच्या सत्रात पोलिसांनी (Police) मोठी कारवाई करत अंदाजे 450 किलो गांजा जप्त (Cannabis Seized) केला आहे. ही कारवाई अत्यंत गोपनीयरीत्या करण्यात आली असून, घटनेनंतर संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकेवाडी शिवारात पडवळ नावाच्या व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणात गांजा (Cannabis) असल्याची खात्रीशीर माहिती अधिकार्यांना मिळाली होती. माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने पथक तयार केले आणि कारवाईचे नियोजन करण्यात आले. निर्धारित वेळी पथकाने सुकेवाडी (Sukewadi) शिवारात छापा टाकला असता, घराच्या आतील खोलीत तसेच एका छोट्या वाहनात मोठ्या प्रमाणात गांजा (Cannabis) ठेवलेला आढळून आला. सुरुवातीच्या पाहणीतच पोलीस थक्क झाले, कारण जप्त (Seized) करण्यात आलेल्या गांजाचे वजन शेकडो किलोमध्ये असल्याचे निदर्शनास आले.
कारवाईची गंभीरता लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, तसेच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर तसेच मुंबई व नाशिक पोलिस (Mumbai And Nashik Police) यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा, जप्ती प्रक्रिया आणि पुढील तपासाची दिशा निश्चित करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या गांजाची (Cannabis) बाजारातील किंमत जवळपास 1 कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
एका सामान्य व्यक्तीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा सापडल्याने तालुक्यात आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषत: शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत इतका मोठा अवैध साठा मिळाल्याने परिसरात चालणाऱ्या बेकायदेशीर धंद्यांबाबत अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत. स्थानिक नागरिकांतही या घटनेची मोठी चर्चा सुरू असून, या प्रकरणामागील प्रमुख साखळी, पुरवठादार आणि ग्राहक कोण आहेत याचा शोध घेण्यासाठी पोलीस आता अधिक तपास करत आहेत.




