Sunday, November 24, 2024
HomeनगरJayashree Thorat : न्यायाची मागणी करणाऱ्या जयश्री थोरातांवरच गुन्हा दाखल!

Jayashree Thorat : न्यायाची मागणी करणाऱ्या जयश्री थोरातांवरच गुन्हा दाखल!

संगमनेर । Sangamner

सध्या विधानसभेची आचारसंहिता सुरू असताना विनापरवानगी ठिय्या आंदोलन व असंवैधानिक शब्दांचा वापर करून जोडे मारो आंदोलन केल्याने खासदार भाऊसाहेब वाकचौरे, डॉ. जयश्री थोरात, दुर्गा तांबे, डॉ. सुधीर तांबे, उत्कर्षा रुपवते, इंद्रजीत थोरात, शरयू थोरात, सुरेश थोरात, प्रभावती घोगरे, करण ससाणे, बाबा ओहोळ यांसह 50 जणांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी संदीप आघाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, डॉ. सुजय विखे पाटील यांनी धांदरफळ येथे युवा संकल्प मेळावा आयोजित केला होता. त्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंतराव देशमुख याने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्याबाबत अतिशय गलिच्छ भाषा वापरुन टीका केली होती. त्याच्या निषेधार्थ आणि न्याय मागण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते, समाजसेवक आणि अन्य पक्षांचे पदाधिकारी यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाणे गाठले होते. तेथे जाऊन या सर्वांनी डॉ. सुजय विखे, कार्यक्रमाचे आयोजक आणि वसंतराव देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, आठ तास ठिय्या मांडून देखील पोलिसांनी गुन्हा दाखल करणे किंवा कारवाई करण्याची भूमिका घेतली नाही.

त्यामुळे संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले. यानंतर या जमावाचे रुपांतर थेट आंदोलन आणि घोषणाबाजीसह सभेत झाले. यावेळी संतप्त झालेल्या जमावाने डॉ. सुजय विखे आणि वसंतराव देशमुख यांच्या फोटोला जोडे आणि लाथा मारो आंदोलन केले. दरम्यान, न्याय मागण्यासाठी गेलेल्या या जमावाकडे कोणतीही परवानगी नव्हती, सध्या विधानसभेची निवडणूक सुरू असल्याने आचारसंहिता लागू आहे. परिणामी पोलिसांनी पुढील कारवाई केली. डॉ. जयश्री थोरात यांना आठ तास बसून देखील न्याय मिळत नाही. त्यामुळे जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते आणि समाजसेवक तथा राजकीय व्यक्तींनी संगमनेर गाठले होते. परिणामी तालुका पोलीस ठाण्याच्या बाहेर प्रचंड मोठी गर्दी जमा झाली होती. मात्र ती कायद्याला धरुन नाही असे म्हणत पोलिसांनी 25 ज्ञात आणि 25 अज्ञात अशा 50 जणांवर भारतीय न्यायसंहिता कलम 223, 37 (1)(3) चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

यांच्यावर झाला गुन्हा दाखल
याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यामध्ये खासदार भाऊसाहेब वाकचौरे, डॉ. जयश्री थोरात, दुर्गा तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, विश्वास मुर्तडक, इंद्रजीत थोरात, शरयू थोरात, सुरेश थोरात, राहाता विधानसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे (रा. लोणी), सचिन गुजर (रा. श्रीरामपूर), बाबा ओहोळ (रा. वडगाव पान, ता. संगमनेर), सीताराम राऊत (संगमनेर), वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते, बाळासाहेब गायकवाड (रा. आश्वी), हेमंत ओगले (रा. श्रीरामपूर), करण ससाणे (रा. श्रीरामपूर), दीपाली करण ससाणे (रा. श्रीरामपूर), अमर कतारी (संगमनेर), अशोक सातपुते (रा. खांजापूर), माधवराव कानवडे (रा. संगमनेर), सचिन खेमनर, इंद्रजीत खेमनर (रा. साकूर), राजाभाऊ खरात (रा. घुलेवाडी), सचिन चौघुले (रा. शिर्डी), सचिन दिघे (रा. तळेगाव) यांच्यासह अन्य 25 जणांचा समावेश आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या