Sunday, September 22, 2024
Homeक्राईमसंगमनेर शहरात खुलेआमपणे गोवंश कत्तलखाने सुरूच

संगमनेर शहरात खुलेआमपणे गोवंश कत्तलखाने सुरूच

मोठ्या शहरांना होतोय पुरवठा || पोलिसांसह पालिकेचे दुर्लक्ष

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

- Advertisement -

गोवंश जनावरांचे मांस पुरवठ्याचे शहर म्हणून राज्यात ओळख बनलेल्या संगमनेर शहरात मोठ्या प्रमाणावर खुलेआम कत्तलखाने सुरू असताना आता अनेक घरांमध्ये छोटे कत्तलखाने सुरू झाले आहेत. पोलीस आणि पालिकेच्या नाकावर टिच्चून हे कत्तलखाने सुरू असल्याचे दिसत आहे. पोलीस अधिकार्‍यांची मूकसंमती असल्याने संगमनेर शहरात दररोज शेकडो जनावरांची कत्तल सुरू आहे. पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन यांचे या कत्तलखान्यांकडे दुर्लक्ष होत आहे. कत्तलखाने वाढल्याने पुन्हा एकदा संगमनेर शहरात मोठे आंदोलन उभे राहण्याची चिन्हे आहेत.

महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायदा अस्तित्वात आहे. हा कायदा असतानाही संगमनेर शहरात मात्र वर्षानुवर्षे जनावरांची कत्तल सुरू आहे. पोलिसांनी शेकडो वेळा कारवाया करूनही कत्तलखाने बंद होत नसल्याने पोलिसांच्या कारवाईबाबतच शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. शहरातील भारतनगर, अलकानगर, कोल्हेवाडी रस्ता, जोर्वे रस्ता, जमजम कॉलनी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर कत्तलखाने सुरू आहेत. या कत्तलखान्यांमधून तयार होणारे गोमांस बाहेरील शहरांमध्ये पाठवले जात आहे. मुंबई येथे संगमनेरच्या गोमांसाला मोठी मागणी असल्याने दररोज मोठ्या प्रमाणावर गोमांस पुरवले जात आहे. रात्री अनेक गाड्यांमधून हे गोमांस मुंबईला पाठवले जात आहे. कत्तलखान्याच्या व्यवसायामधून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. यामुळे या व्यवसायामध्ये नवनवीन लोक सहभागी होत आहेत.

शहरामध्ये आठ ते दहा मोठे कत्तलखाने सुरू असल्याची चर्चा आहे. आता या कत्तरखान्यासोबतच छोटे-छोटे कत्तलखानेही सुरू झाले आहेत. अलकानगर, भारतनगर, जोर्वे रस्ता, कोल्हेवाडी रस्ता या भागातील अनेक घरांमध्ये आता कत्तलखाने चालवले जात आहेत. या कत्तलखान्यांमधून दररोज अनेक जनावरांची सर्रास कत्तल केली जात आहे. मात्र, याकडे शहर पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. कत्तलखाना चालकांकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ होत असल्याने पोलीस अधिकारी या कत्तलखान्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे बेकायदेशीररित्या कत्तलखान्यांना पाणीपुरवठा होत आहे. याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचेही दिसत आहे. यामुळे हिंदुत्ववादी संघटना पुन्हा एकदा आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. बजरंग दलाचे कार्यकर्ते अनेक ठिकाणी कत्तलीसाठी जाणार्‍या जनावरांची सुटका करत असताना पोलीस मात्र कत्तलखाना चालकांना अभय देत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

संगमनेर शहरातील कत्तलखान्यांमध्ये बेकादेशीररित्या पाणीपुरवठा होत असल्यास अशा लोकांविरोधात कारवाई करणार आहे. याचबरोबर नगरपालिकेत ठराव करूनही कारवाई करण्यात येईल.
राहुल वाघ (मुख्याधिकारी-संगमनेर नगरपालिका)

कत्तलखान्याला कोणता अधिकारी व कर्मचारी पाठिशी घालत असेल त्याची माहिती घेऊन कडक कारवाई करण्यात येईल. याशिवाय कत्तलखाने सुरू असल्यास मला कळवा, त्वरित पथक पाठवून कारवाई केली जाईल.
– सोमनाथ वाघचौरे (उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर)

- Advertisment -

ताज्या बातम्या