संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
शहरातील हायटेक बसस्थानक, हमरस्ते, उपनगर आणि ग्रामीण भागातही गंठण चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे महिलांनी घराबाहेर पडावे की नाही असा प्रश्न पडला आहे. दोन दिवसांपूर्वी भरदुपारी एसटी बसमध्ये चढत असताना दोन महिलांचे सतरा तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून चोरट्यांनी पोबारा केला आहे. त्यातच पोलिसांना तपास लावण्यात यश मिळत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून गंठण चोरांनी संगमनेर शहर चांगलेच लक्ष्य केले आहे. शहरातील बसस्थानक, हमरस्ते, उपनगर परिसरात पायी चालणार्या आणि दुचाकीवर असलेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून चोरटे पलायन करत आहे. परंतु, पोलिसांना यावर नियंत्रण मिळवता आलेले नाही. दोन दिवसांपूर्वी बसस्थानकामध्ये एसटीमध्ये चढणार्या दोन महिलांचे भरदुपारी सोन्याचे दागिने आणि पैसे चोरून चोरट्यांनी पलायन केले आहे. याचबरोबर ग्रामीण भागातील चंदनापुरी, साकूर फाटा येथूनही दोन महिलांचे दागिने चोरुन नेले आहेत. यामुळे महिला वर्गात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.
सध्या लग्नसराई सुरू आहे. यामुळे महिला मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत. परंतु, परिधान केलेल्या दागिन्यांवर चोरटे लक्ष ठेवून ओरबाडून नेत असल्याचे वारंवार घडणार्या घटनांवरुन दिसत आहे. यापूर्वी देखील शहरासह परिसरात गंठण चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. परंतु, पोलिसांना त्यांचा तपास लावता आलेला नाही. मध्यंतरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गंठण चोरांना पकडल्याचा अपवाद वगळता शहर पोलिसांना नियंत्रण मिळवता आलेले नाही. विशेष म्हणजे बसस्थानकासह अनेक महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही पोलिसांना चोरट्यांचा माग काढता येत नसल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे सरकारच्या लाडक्या बहिणींनी दागिने घालून घराबाहेर पडावे की नाही ?असा प्रश्न पडला आहे.
संगमनेर बसस्थानकात पोलीस चौकी करण्यात आलेली आहे. परंतु, अनेकदा तिथे पोलीस कर्मचारी नसल्याचेच दिसून येते. यामुळे चोरट्यांचे चांगलेच फावत असून, दिवसाढवळ्या महिलांच्या दागिन्यांवर डल्ला मारत आहे. यामुळे पोलीस चौकी केवळ शोभेचे बाहुले म्हणूनच दिसत आहे.
वीस सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार…
सरकारच्या निधीतून बसस्थानकात वीस सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. याशिवाय दररोज तेथे एका पोलीस कर्मचार्याची नियुक्ती केली जात आहे. अजूनही कर्मचार्यांची संख्या वाढवून गंठण चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी कडक पावले उचलणार आहे.
– रवींद्र देशमुख (पोलीस निरीक्षक-संगमनेर शहर)