Monday, June 24, 2024
Homeनगर15 वासरे घेऊन जाणारी दोन वाहने पोलिसांच्या ताब्यात

15 वासरे घेऊन जाणारी दोन वाहने पोलिसांच्या ताब्यात

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

- Advertisement -

संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द शिवारातील सोनवणे वस्ती नजीक उभे असलेल्या दोन वाहनांतून कत्तलीसाठी वासरे नेत असल्याचा संशय आल्याने गावातील तरुणांनी वासरे वाहतूक करणारी दोन्ही वाहने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिली. यावेळी पोलिसांनी तब्बल 9 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मंगळवार दि. 7 मे 2024 रोजी सायंकाळच्या सुमारास मोठेबाबा कमानीजवळ सोनवणे वस्तीनजीक एका गाडीत कत्तलीच्या उद्देशाने वासरे घेऊन जात असल्याची माहिती 112 नंबरवर अमोल जाधव आणि त्यांच्यासमवेत असलेल्या प्रणव सोनवणे, अक्षय गवळी, स्वप्नील गायकवाड, यश भंडारी (सर्व रा. आश्वी खुर्द) यांनी पोलिसांना फोन करून कळवली.

माहिती मिळताच आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी मालवाहतूक गाडीमध्ये नर जातीची दहा जर्शी वासरे, काळ्या रंगाचा चिकटटेप तोंडाला लावलेले व पाय दोरीने बांधलेले आढळून आले. दुसर्‍या गाडीत पाच वासरे याच अवस्थेत आढळून आली. त्यामुळे फोन करणारे अमोल जाधव व त्यांच्या सहकार्‍यांकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता फिरोज नवाज शेख व त्याचा भाऊ अन्वर नवाब शेख (दोन्ही रा. शेडगाव, ता. संगमनेर) आणि दोन अनोळखी व्यक्ती हे वासरे गाडीत भरत होते. आम्हाला पाहून ते उसाच्या शेतात पळून गेल्याची माहिती जाधव व त्यांच्या सहकार्‍यांनी सांगितली. यानंतर पोलिसांनी 15 हजार रुपये किंमतीची 15 वासरे, 5 लाख रुपये किंमतीचे (एम. एच. 17 बीवाय. 4893) मालवाहतूक वाहन आणि 4 लाख रुपये किंमतीचे (एम. एच. 04. डीवाय. 7118) वाहन असा एकूण 9 लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

दरम्यान पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र वाकचौरे यांनी आश्वी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली असून आरोपी विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम 1995 चे कलम 5 (अ), 9, प्राण्याचा छळ प्रतिबंध अधिनियम 1960 कलम 3, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या