संगमनेर (शहर प्रतिनिधी)
शिक्षकाने इयत्ता तिसरी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील खराडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडली. या शिक्षकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, खराडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता तिसरीच्या वर्गात शिक्षण घेणारी पीडित मुलगी नेहमीप्रमाणे सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मंथन क्लासच्या मुलींसोबत तिचा राहिलेला गृहपाठ पूर्ण करण्यासाठी गेली होती व ती रोजच्याप्रमाणे त्यांच्या शाळेच्या वर्गात बसली होती.
त्यानंतर सदर विद्यार्थिनी ही दुपारी जेवणाच्या सुट्टीत तिच्या दोन मैत्रीणींना घेऊन पळत पळत घरी आली. तू घरी का आली असे तिच्या आईने विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला. वर्गशिक्षकांनी तिला पाठीमागून येऊन तिच्याशी असभ्य वर्तन केले. त्यानंतर सदर मुलीच्या आई- वडिलांनी मुख्याध्यापकांना घडलेला प्रकार सांगितला.
मुख्याध्यापकांनी सदर मुलीच्या पाच मैत्रिणींना त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतले. चौकशी केली असता सदर शिक्षकांनी इतर मुलींच्या बाबतीतही असाच प्रकार केल्याचे या मुलींनी सांगितले. वर्गशिक्षक बाळशिराम यशवंतराव बांबळे हे नवीन शिक्षक म्हणून शाळेत आल्यापासून नेहमी असे प्रकार करत असल्याचे यावेळी या मुलींनी सांगितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी शाळेतील या शिक्षकाविरुद्ध बीएनएस कलम ७४,७५, बालकांचे लैंगिक अत्याचार कलम ८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख करत आहेत.