Saturday, May 25, 2024
Homeनगरकुरकुटवाडी येथे तरुणाचा मृत्यू; बिबट्याचा हल्ला की अन्य कारण ?

कुरकुटवाडी येथे तरुणाचा मृत्यू; बिबट्याचा हल्ला की अन्य कारण ?

घारगाव | प्रतिनिधी

संगमनेर तालुक्यातील कुरकुटवाडी येथे एका २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. संबधित तरुणाचा मृत्यू बिबट्याचा हल्ल्यात की अन्य कारणाने झाला याचा तपास घारगाव पोलिसांनी सुरू केला आहे.

- Advertisement -

सचिन भानुदास कुरकुटे (वय -२२) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनस्थळावरून मिळालेली माहिती अशी, भानुदास विष्णू कुरकुटे हे पत्नी संगीता सह त्यांची दोन मुले सचिन व हरीश यांचे समवेत राहतात. भानुदास कुरकुटे हे सध्या आळंदी येथे ॲम्बुलन्सवर चालक आहेत. सचिन व हरीश नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्री घराच्या बाहेर पडवीत झोपलेले होते. त्यांची आई संगीता घरात होती.

रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास हरीश जागा झाला. त्याला सचिनवर बिबट्याने हल्ला केल्याचे दिसले. त्यानंतर हरीशने आजूबाजूच्या ग्रामस्थांना कळवून सचिनला आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात नेले असे हरीशचे म्हणणे आहे. डॉक्टरांनी सचिनला तपासणीनंतर मृत घोषित केले. सचिनचा मृतदेह आळे येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. ही बाब वनविभाग व घारगाव पोलिसांना शुक्रवारी सकाळी समजली.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वनपाल हारून सय्यद, वनरक्षक श्रीकिसन सातपुते, अनथा काळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र घारगाव पोलिसांना घटनेची माहिती आज सकाळी साडेआठच्या सुमारास समजली त्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष खेडकर,पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे,पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद चव्हाण, प्रमोद गाडेकर आदींसह घटनास्थळी गेले. सचिनचा भाऊ हरीश याच्या म्हणण्यानुसार बिबट्याने हल्ला केला आहे. मात्र, शवविच्छेदन रिपोर्ट आल्यानंतरच माहिती मिळेल असे पोलीस व वनविभागाचे म्हणणे असल्याने सचिनचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाला की इतर काही कारणास्तव झाला हे मात्र, अद्याप समजू शकले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या