संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner
संगमनेर शहर पोलीस ठाण्यालगत असलेल्या सबजेलमधून न्यायालयीन कोठडीत असलेले चार आरोपी जेलचे गज तोडून पळून गेले होते. हे चारही आरोपी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव जिल्ह्यातील जामनेर शिवारात पकडले. त्यांना वाहनातून पळून जाण्यास मदत करणार्या दोघांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अवघ्या 36 तासांच्या आत पोलिसांनी या आरोपींना जेरबंद केले आहे.
बुधवार दि. 8 नोव्हेंबर 2023 रोजी पहाटे 6.30 वाजेच्या सुमारास संगमनेर उपकारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले राहुल देवीदास काळे, रोशन रमेश ददेल उर्फ थापा, आनंद छबू ढोले व मच्छिंद्र मनाजी जाधव हे चौघे आरोपी बॅरेक क्रमांक 3 चे दक्षिण बाजुकडील 3 गज कापून त्यातून बाहेर येवून पांढर्या रंगाच्या कारमधून अज्ञात इसमांसह पसार झाले. या घटनेने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली होती.
याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल आनंद बबनराव धनवट यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 916/2023 भारतीय दंड संहिता 224, 225 प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
संगमनेरच्या सबजेलमध्ये त्या रात्री सुरक्षा गार्ड म्हणून नेमणूकीस असलेल्या कर्मचार्यांना देखील या आरोपींनी सुगावा लागू दिला नाही. तिन गज कापून हे आरोपी जेलबाहेर पडले. या घटनेने नेमणूकीस असलेल्या तीन पोलीस कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षकांनी केली आहे. तर फरार झालेल्या आरोपींना शोधण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी नगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना सदर गुन्ह्याचा समांतर तपास करुन आरोपींचा शोध घेवून तात्काळ ताब्यात घेण्याबाबत आदेश केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर हे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह संगमनेरात दाखल झाले. पथकाने घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. तेथील सीसीटीव्ही फुटेज घेतले.
संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी रात्री तीन पथके तपासासाठी रवाना करण्यात आले. त्यानंतर घटनेचा अभ्यास करुन व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे गुन्ह्याचा तपास करुन राहुल देवीदास काळे, रोशन रमेश ददेल ऊर्फ थापा, आनंद छबु ढोले व मच्छिंद्र मनाजी जाधव या आरोपींना ताब्यात घेतले. त्याचबरोबर या आरोपींना पळून जाण्यास मदत करणारे वाहन चालक व एक साथीदार अशा 6 जणांना पोलिस पथकाने जळगाव जिल्ह्यातील जामनेेर भागातून वाहनासह ताब्यात घेतले. आरोपींनी ज्या पहिल्या वाहनातून प्रवास केला ते वाहन वडगाव शेरी येथील असल्याची माहिती समजते आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक रविंद्र कर्डीले, फुरकान शेख, संतोष लोढे, विशाल दळवी, संदीप चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल अमृत आढाव, बाळासाहेब खेडकर, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल उमाकांत गावडे व संभाजी कोतकर व संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री. जायभाय यांच्या पथकाने केली.
..हे तिघे निलंबीत
जेल तोडून फरार झालेल्या आरोपींच्या प्रकरणात जिल्हा पोलीस अधिक्षकांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल गोडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मेंगाळ, महिला पोलीस कॉन्स्टेबल भांगरे यांना दोषी धरत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली.
जेल तोडून फरार झालेल्या आरोपींच्या मागावर तीन पथके रवाना झाली. त्यातील एक पथक ज्या पहिल्या गाडीतून हे आरोपी पसार झाले त्यांचा माग काढत होते. तांत्रिक बाबीतून सदर आरोपी हे धुळे येथील एका हॉटेलमध्ये थांबल्याचे समजले. दुसरे पथक तेथे धडकले. मात्र त्यापूर्वीच आरोपींनी ठिकाण सोडले होते. पुढे आरोपी ज्या गाडीतून प्रवास करत होते त्या गाडीचे जीपीएस कट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र दुसरीच वायर कट झाल्याने गाडी बंद पडली. आरोपींनी तेथून दुसर्या वाहनातून म्हणजे बोलेरोतून प्रवास सुरू केला. ज्या दिशेने ते निघाले होते त्या वाहनाच्या मागावर तिसरे पथक होते. पुढे जळगाव जिल्ह्यातील जामनेर शिवारात हे वाहन पथकाने पकडले आणि आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडले.