अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी फाटा येथील हॉटेल रंगीला पंजाब फॅमिली रेस्टॉरंटचा अन्न व्यवसाय परवाना अन्न व औषध प्रशासनाने पुढील आदेशापर्यंत निलंबित केला आहे. तपासणीदरम्यान अस्वच्छता आढळल्याने अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन लक्षात घेऊन जनहित आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हॉटेल तपासणीच्या सुचना केल्या आहेत. त्यानुसार अहिल्यानगर अन्न व औषध प्रशासन विभागाकडून जिल्ह्यातील हॉटेलची तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर रायतेवाडी फाटा येथे असलेल्या हॉटेल रंगीला पंजाब फॅमिली रेस्टॉरंटची अहिल्यानगर अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (3 जुलै) तपासणी केली असता त्याठिकाणी अस्वच्छता आढळून आली.
स्वच्छतेबाबत कोणतेही नियम पाळले गेले नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अन्न सुरक्षा व मानके (अन्न व्यवसायांचे परवाना व नोंदणी) नियम, 2011 मधील नियमन अंतर्गत हॉटेल रंगीला पंजाब फॅमिली रेस्टॉरंटचा परवाना निलंबन आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, निलंबन कालावधीत संबंधित आस्थापनाने कोणत्याही प्रकारचा अन्न व्यवसाय चालवू नये. आदेशाचे उल्लंघन करून व्यवसाय सुरू ठेवल्यास संबंधितांविरूध्द अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.




