Saturday, July 27, 2024
Homeनगरसंगमनेर शहरासह ग्रामीण भागात अवैध लॉजिंगला अच्छे दिन

संगमनेर शहरासह ग्रामीण भागात अवैध लॉजिंगला अच्छे दिन

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

सुसंस्कृत शहर आणि तालुका म्हणून संगमनेरची ओळख आहे. मात्र, कॅफे हाऊस आणि अवैधरित्या सुरू असलेल्या लॉजिंगमुळे अक्षरशः रया गेली आहे. खुलेआमपणे शहरात आणि ग्रामीण भागात अवैध लॉजिंग सुरू झाल्याने तरुणाई वाममार्गाला गेली आहे. तर अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण होत आहे. यामुळे आता उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांनीच यात लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.

- Advertisement -

संगमनेर शहरासह कोल्हार-घोटी मार्ग, कर्हे घाट ते आळेखिंडपर्यंत पुणे-नाशिक महामार्गाच्या कडेला असंख्य हॉटेल्स आहेत. तेथे काही हॉटेलांत रितसर परवानगी घेऊन लॉजिंग सुरू आहेत तर काही ठिकाणी अनेक हॉटेलांत अवैधरित्या विनापरवाना लॉजिंग सुरू झाल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे. चंदनापुरी घाट ते जावळेवस्ती परिसरात या व्यवसायाला जणू सुगीचे दिवस आले आहेत. महाविद्यालयीन तरुण-तरुणी येथे पाहायला मिळत आहेत. याशिवाय अनेक तरुण अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात ओढून लॉजिंगवर नेत लैंगिक शोषण करत असल्याचे प्रकार घडत आहे.

अत्यंत गंभीर प्रकार घडत असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने तरुणाई सहजगत्या वाममार्गाला जात आहे. तर अल्पवयीन मुली लैंगिक शोषणाच्या बळी पडत आहे. अवैध लॉजिंग चालक हजार ते पंधराशे रुपये आकारुन एक तासा करिता खोली उपलब्ध करुन देतात. मात्र, खोली घेणार्‍यांकडून हॉटेल चालक कोणताच ओळखीचा पुरावा घेत नसल्याने एकप्रकारे याला ते खतपाणीच घालत आहे. त्यामुळे धडाकेबाज अधिकारी असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी याकडे लक्ष देऊन लॉजिंग चालकांवर कारवाई करण्याची गरज आहे. दरम्यान संगमनेर शहरात उच्च शिक्षणाची सोय आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणी येथे शिक्षणासाठी येतात. मात्र, प्रेमाच्या नावाखाली ‘त्या’ लैंगिक शोषणाच्या बळी पडतात. दिवसभर महाविद्यालयात गेलेली आहे, म्हणून पालकही अनभिज्ञ राहतात. त्यासाठी पालकांनी वेळीच सावध होऊन मोबाईल तपासणे आणि दिवसभरात आपली मुलगी शाळेत गेली होती का नाही याची खातरजमा करणे गरजेचे आहे.

लॉजिंगबाबत अधिकृत परवाना नसलेल्या ठिकाणी कोणताही हॉटेल चालक निवासी सुविधा व्यावसायिक तत्त्वावर उपलब्ध करून देत असेल तर ते बेकादेशीर आहे. अशा ठिकाणी बलात्कार व छेडछाडी अशा गंभीर तक्रारी आल्यास संबंधित मालकावर कारवाई केली जाईल.

– सोमनाथ वाघचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर

- Advertisment -

ताज्या बातम्या