संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
शहरातील गल्लीबोळात अवैधरित्या मटका व्यवसाय जोरात सुरू असून सुगीचे दिवस आल्याचे पाहावयास मिळत आहे. मात्र याकडे संगमनेर शहर पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे. यावरुन त्यांना नेमका कोणाचा आशीर्वाद मिळतोय, असा प्रश्न जनतेला पडला आहे. शहरात सर्रासपणे अवैध धंदे सुरू आहेत. यामध्ये मटका व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. असे असतानाही शहर पोलीस त्यांच्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत. कारवाई झाल्याचे सध्या तरी ऐकीवात नाही.
यामुळे मटका खेळणार्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. यात तरुणाई चांगलीच गुंतलेली असल्याचे दिसत आहे. परिणामी, अनेकांचे प्रपंच उघडे पडले आहेत. तरी देखील पोलीस केवळ बघ्याचीच भूमिका घेत आहेत. यामुळे अवैधरित्या मटका व्यवसाय करणार्यांचे चांगलेच फावले आहे. वास्तविक पाहता शहर पोलिसांनी स्वतःहून पुढे येऊन या मटका व्यावसायीकांवर कारवाई करणे गरजेचे होते. मात्र आजपर्यंत तसे झाले नाही. उलट पोलिसांकडूनच आधार मिळतोय की काय? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी संगमनेर शहर पोलीस ठाणे हद्दीत लक्ष घालावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
येथे चालतोय मटका व्यवसाय…
संगमनेर शहरातील तीनबत्ती चौक, कोल्हेवाडी रोड, दिल्ली नाका, तेलीखुंट, शक्तीमान टॉवर, अकोले नाका, मेनरोड, बसस्थानक, नेहरू गार्डन परिसर, घुलेवाडी याठिकाणी खुलेआम मटका व्यवसाय सुरू आहे. ही सर्व ठिकाणे शहर पोलिसांना माहिती असताना देखील कारवाई होत नाही. यामुळे पोलिसच मटका व्यावसायिकांना पाठिशी घालतायेत का? असा प्रश्न देखील आता निर्माण झाला आहे.