संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
संगमनेर तालुक्यातील जनतेच्या मनात जे स्वप्न आहे, ते माझेही स्वप्न आहे. सरकार आल्यानंतर त्यांच्यावर मोठी जबाबदारी पडणार हे नक्की आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या खा.सुप्रिया सुळे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व आ.बाळासाहेब थोरात करतील, असे स्पष्ट संकेत साकूरच्या सभेमधून दिले आहेत. मित्रपक्षातील महत्त्वाच्या नेत्याने हे विधान केल्याने नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटले आहे. महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या निमित्ताने काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खा.सुप्रिया सुळे नगर जिल्हा दौर्यावर होत्या. सायंकाळी उशिरा त्यांची संगमनेर मतदारसंघात साकूर येथे सभा झाली.
यावेळी त्यांनी संगमनेरचे सुसंस्कृत राजकारण, आ.थोरात यांचे विधायक नेतृत्व आणि डॉ.जयश्री थोरात यांच्या निमित्ताने आश्वासक भावी राजकीय पिढी यांचा उल्लेख करत मोठे विधान केले. सभेला जमलेल्या गर्दीला उद्देशून त्या म्हणाल्या, आज मी जल्लोषाच्या सभेसाठी आले आहे, ही प्रचाराची सभा नाही. कारण आ.बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्व उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. तुमच्या मनात जे स्वप्न आहे, ते पूर्ण व्हावे ही माझीही इच्छा आहे. महाराष्ट्राला एका सुसंस्कृत नेतृत्वाची खरच गरज आहे. महाविकास आघाडीचे सरकार होते, तेव्हा आणि आताही राज्यातील काही मुद्यांवर चर्चा करायची असेल तर ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब हक्काने आ.बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करतात आणि कोणताही प्रश्न असो, तो सुटतो.
महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर त्यांच्यावर मोठी जबाबदारी पडणार आहे, असे त्या म्हणाल्या. एकप्रकारे त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत संकेत दिल्याचे मानले जात आहे. लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मतदारसंघातील खा.निलेश लंके यांच्या विजयात आ.थोरात यांचा वाटा सिंहाचा होता, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, डॉ.जयश्री थोरात यांचं भाषण ऐकले, तेव्हा एका सुसंस्कृत पित्याची एक सुसंस्कृत मुलगी कशी असते, हे दिसले, असे त्या म्हणाल्या.
अजितदादांना टोला
जेव्हा जेव्हा आ.बाळासाहेब थोरातांना भेटते, तेव्हा सुसंस्कृत मोठा भाऊ कसा असावा तर तो आ.थोरातांसारखा असावा, हे जाणवत राहतं, असा स्नेह व्यक्त करत खा.सुप्रिया सुळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अप्रत्यक्ष टोलाही लगावला.