संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner
येथील नगरपालिकेत काम करणार्या एका कर्मचार्याने मद्याच्या धुंदीमध्ये अर्धनग्न अवस्थेत नगरपालिका कार्यालयात गोंधळ घातला. हा कर्मचारी एका माजी नगराध्यक्षांचा सख्खा भाऊ आहे. या कर्मचार्याने घातलेल्या गोंधळाच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाने नगरपालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून त्या कर्मचार्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. संगमनेर नगरपालिकेच्या एका कर्मचार्याने हे कृत्य केले आहे. त्याने पालिका कार्यालयात अर्धनग्न अवस्थेत शिरून पालिकेच्या अधिकार्याला शिवीगाळ करून तुमच्या मुलाबाळांना संपवून टाकीन अशी धमकी दिली. हा सर्व प्रकार शुक्रवार दि. 23 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 3:30 ते 4 वाजण्याच्या दरम्यान घडला.
नेमकी त्यादिवशी पालिकेत लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी व अन्य कामांसाठी अनेक महिला कार्यालयात आलेल्या होत्या. महिलांनी हा प्रकार पाहिल्यानंतर त्या थेट मुख्यधिकार्यांच्या दालनात शिरल्या. त्यामुळे पालिकेत एकच गोंधळ उडाला. त्यानंतर मुख्याधिकार्यांनी संबंधित व्यक्तीला कारणे दाखवा नोटीस काढली आहे. आता या कर्मचार्यावर कारवाई होणार की राजकीय वरदहस्त मिळणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, मुख्याधिकार्यांनी या कर्मचार्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नोटीसमध्ये म्हटले आहे आहे की, कर्तव्यात कसूर, बेजबाबदारपणा, हलगर्जीपणा, विनापरवाना कर्तव्यावर गैरहजर राहणे, कार्यालयात अर्धनग्न अवस्थेत येऊन वरिष्ठ अधिकार्यांना धमकी देणे, शिवीगाळ करणे हे कृत्य नगरपरिषदेच्या कार्यालयीन शिस्तीस बाधा आणणारे आहे. या कारणांमुळे मुख्याधिकारी वाघ यांनी महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 प्रमाणे शिस्तभंगाची कारवाई का करू नये? अशी कारणे दाखवा नोटीस या कर्मचार्यास काढून तीन दिवसांच्या आत खुलासा सादर करण्यास सांगितले आहे. मुदतीत खुलासा सादर न केल्यास पुढील उचित कारवाई करण्यात येईल, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.
या घटनेचा भारतीय जनता पक्षाने निषेध केला असून भाजप कार्यकर्त्यांनी नगरपालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. याप्रसंगी अमोल खताळ यांनी नगरपालिका कर्मचार्याच्या या वागणुकीचा जाहीर निषेध करून या प्रकरणांमध्ये दोषी असलेल्या कर्मचार्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच यामध्ये स्थानिक राजकीय हस्तक्षेपामुळे जर कारवाई होणार नसेल तर भारतीय जनता पक्षाच्यावतीने मोठ्या स्वरूपात आंदोलन करण्यात येईल, असे मुख्याधिकार्यांना सांगितले. यावेळी महिला ओबीसी जिल्हाध्यक्ष कांचन ढोरे, महिला तालुकाध्यक्षा कविता पाटील, जिल्हा सचिव राजेंद्र सांगळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.