Friday, December 13, 2024
Homeनगरसंगमनेर खुर्द येथील हत्याप्रकरणी 3 आरोपी जेरबंद

संगमनेर खुर्द येथील हत्याप्रकरणी 3 आरोपी जेरबंद

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

पतीचा पत्नीने साथीदारांच्या मदतीने डोक्यात कोयत्याने वार करुन खून केल्याची घटना संगमनेर खुर्द शिवारात घडली होती. या घटनेतील तिघा आरोपींना संगमनेर शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे.

- Advertisement -

दिपाली मारुती डामसे, रमेश तुकाराम भले (वय 26, रा. येणेरे, ता. जुन्नर), गणेश बाळशीराम भालेकर (वय 35, रा. काटेडे, ता. जुन्नर) अशी आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मारुती आबा डामसे (वय 41, हल्ली रा. संगमनेर खुर्द) याचे प्रेत संगमनेर खुर्द शिवारातील रमेश पंढरीनाथ सुपेकर यांचे शेतालगतचे प्रवरा नदीपात्रात तरंगतांना दि. 15 सप्टेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता आढळून आले होते. त्याचा धारधार हत्याराने गळा चिरुन खून केल्याचे दिसून आले. याबाबत मयताचा भाऊ पांडुरंग डामसे यांनी दिपाली मारुती डामसे हिने तिच्या साथीदाराच्या मदतीने मारुती डामसे याचा गळा चिरुन खून केला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी मयताची पत्नी व तिचे दोन साथीदार यांच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला होता.

सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके नेमली होती. सदर गुन्ह्याचा समांतर तपास करुन सर्वात प्रथम सदर गुन्ह्यातील मयताची पत्नी दिपाली मारुती डामसे हीस पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. तिच्याकडे विचारपूस केली असता सुरुवातीला तिने उडवाउडवीचे उत्तरे देत तपासाची दिशा भरकटावली. त्यानंतर तांत्रिक गोष्टींचा तपासात आधार घेवून सदर महिला आरोपीचे साथीदार रमेश तुकाराम भले (वय 26, रा. येणेरे, ता. जुन्नर), गणेश बाळशीराम भालेकर (वय 35, रा. काटेडे, ता. जुन्नर) यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देवून गुन्ह्यात वापरलेले हत्याराबाबत विचारपूस केली असता आरोपी रमेश भले याने त्याचेकडील लोखंडी कोयत्याने मारुती डामसे यास मारुन त्याचा खून केला. त्यानंतर कोयता चंदनापुरी घाटात फेकून दिल्याचे सांगितले.

पोलिसांनी सदर ठिकाणी जावून गुन्ह्यात वापरलेला लोखंडी कोयता जप्त केला. त्यानंतर तिनही आरोपींना संगमनेर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघा आरोपींना 25 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, संगमनेरचे पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, सुनिल माळी, सहाय्यक फौजदार रावसाहेब लोखंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवाजी भांगरे, पोलीस नाईक अनिल गवळी, महिला पोलीस नाईक लता जाधव, ज्योती दहातोंडे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कर्पे, हरिश्चंद्र बांडे, आत्माराम पवार, रोहिदास शिरसाठ, अजित कुर्‍हे, कानिफनाथ जाधव, गणेश थोरात, रामकिसन मुकरे, महादु खाडे, तसेच श्रीरामपूरचे पोलीस कॉन्स्टेबल सचिन धनाड, आकाश बहिरट यांनी केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे करत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या