संगमनेर |शहर प्रतिनिधी|Sangamner
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ व अतिक्रमण हटाव मोहिमेतील कर्मचार्यांना दादागिरी करून मुख्याधिकार्यांना शिवीगाळ करून धमकी दिल्याची घटना काल गुरूवारी दुपारी सव्वा बारा वाजे सुमारास शहरातील परिसरात घडली. पोलिसांनी याप्रकरणी दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमनेर शहरातील ठराविक भागातील काही नागरिकांची दादागिरी गेल्या काही दिवसांपासून वाढलेले आहे. दोन वर्षांपूर्वी दिल्ली नाका परिसरात पोलिसांची गाडी अडवून पोलिसांना मारहाण करण्यात आली होती. काल दुपारी मुख्याधिकार्यांना शिवीगाळ करून धमकी देण्यात आली.
शहरातील स. नं. 214/1 मध्ये लखमीपुरा पंचतर्फे चिफ ट्रस्टी मुस्ताक बेग व इतर भोगवटादार, शेख रफिक एजाजुद्दीन यांनी विनापरवाना अनाधिकृतपणे संरक्षक भिंत पाडुन दुकान शेख रफिक एजाजुद्दीन उर्फ रफिक सुन्नी यांना वापरण्यास दिलेले होते. मात्र प्रत्यक्षात तेथे इंडीया पाटा गैरेज या नावाने वाहनांचे पाटे दुरुस्तीचे चालविले जात असून फलकावर रफिक सुन्नी हे नाव व मोबाईल नंबर लिहीलेला होता.
या ठिकाणचे अतिक्रमण काढण्यात यावे असे निवेदन फैज रहेमतुल्ला शेख व इतर 24 नागरिकांनी नगरपालिकेला दिले होते. काल दुपारी सव्वा बारा वाजता सुमारास या ठिकाणी अतिक्रमण हटविण्याबाबत कारवाई सुरू होती. या ठिकाणचे सामान काढून घेण्याची अंतिम संधी देण्यात अतिक्रमण धारकांना देण्यात आली होती. मात्र अतिक्रमण न हटविता शेख रफिक एजाजुद्दीन उर्फ रफिक सुन्नी व सारिज एजाज शेख दोन्ही रा लखमीपुरा या दोघांनी अतिक्रमण हटाव कार्यवाहीला अडथळा आणला. रफिक शेख व सारीज शेख यांनी मुख्याधिकार्यांच्या अंगावर कागदांचा गठ्ठा भिरकावुन त्यांना शिवीगाळ केली. तुझे देख लूंगा मैं, फिर से यही दुकान लगाउंगा अशी धमकी दिली.
याबाबत मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी शेख रफिक एजाजुद्दीन उर्फ रफिक सुन्नी व सारिज एजाज शेख दोन्ही रा लखमीपुरा, संगमनेर यांच्याविरुद्ध गु.र.नं.1032/ 2023 भादंवि कलम 353,504, 506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव करीत आहे.