संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
डॉ. सुजय विखे पाटील यांच्या संगमनेर मतदारसंघात युवा संकल्प मेळाव्यातून धांदरफळ येथील सभेत रहिवासी वसंत देशमुख यांनी आमदार थोरातांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टिका केल्याने समाजमन संतप्त झाले असून शहरासह तालुक्याचे वातावरण ढवळून निघाले. शनिवारी सकाळी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यासमोर आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करुन आरोपींना अटक करण्याची मागणी केली. तत्पूर्वी संतप्त कार्यकर्त्यांनी रात्रभर पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. शनिवारी निषेध सभेत जोरदार घोषणाबाजी करत देशमुख व विखेंच्या पोस्टरला जोडे मारले.
निषेध सभेला खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, प्रभावती घोगरे, हेमंत ओगले, दुर्गा तांबे, डॉ. जयश्री थोरात, उत्कर्षा रुपवते, इंद्रजीत थोरात, सचिन गुजर, करण ससाणे, राहुरीचे बाळासाहेब आढाव, बाबा ओहोळ, इंद्रजीत थोरात, अमर कतारी, संजय फड आदींसह तरुण व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खा.वाकचौरे म्हणाले, थोरात परिवार हा सुसंस्कृत परिवार असून सर्व राज्य त्यांचा आदर करतो. परंतू वाईट प्रवृत्ती काय असते ती आता संगमनेरने नव्हे तर जिल्ह्याने अनुभवली आहे. महायुतीच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करून सर्वांनी निषेध करावा, असे आवाहन त्यांनी केले.
सुसंस्कृत राजकारण ही आपली परंपरा आहे. मात्र कुणी अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावत असेल तर संगमनेर तालुका हे सहन करणार नाही. लोकशाही आहे, मते मांडण्याचा अधिकार आहे. मात्र शिर्डी मतदारसंघातील दडपशाही आणि हुकूमशाही येथे चालणार नाही. संगमनेरचा नागरिक यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिला.
यांना लाज कशी वाटत नाही ?
निषेध सभेत प्रभावती घोगरे म्हणाल्या, ही वाईट संस्कृती राहाता तालुक्याला माहीत आहे. विरोधी बोलले की तंगड्या तोडल्या जातात. महिलांबद्दल इतके वाईट बोलताना यांना लाज कशी वाटत नाही? नगर दक्षिमध्ये जनतेने यांना का पराभूत केले, हे आता लोकांना कळले आहे. अशा प्रवृत्तीला साथ देणारे सुद्धा वाईट आहेत. या सर्वांचा एकजुटीने बंदोबस्त करा. आमदार बाळासाहेब थोरात हे राज्यामध्ये जिल्ह्याचे नाव मोठं करत आहेत. ते राज्य सांभाळतील आपण तालुका आणि जिल्हा सांभाळून अशा वाईट प्रवृत्तींना वेळीच रोखू असे आवाहन त्यांनी केले.