संगमनेर |प्रतिनिधी|Sangamner
दुपारच्या सुमारास आंघोळीसाठी संगमनेरच्या गंगामाई घाटावर गेलेल्या तिघांपैकी दोघे जण प्रवरा नदीपात्रात बुडाल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे तर एक जण बचावला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संगमनेरसह अकोलेत शोककळा पसरली आहे.
निलेश माधव अस्वले (वय 18, रा. शिवाजीनगर, अकोले), अमोल उत्तम घाणे (वय 18, रा. नवीन नवलेवाडी, अकोले) असे मयत युवकांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार निलेश अस्वले, अमोल घाणे व युवराज नवनाथ धुमाळ (वय 18, रा. धुमाळवाडी, ता. अकोले) हे तिघे जण महाविद्यालयीन कामासाठी संगमनेरात आले होते. कामकाज आटोपल्यानंतर हे तिघे घुलेवाडी येथील मित्र रुतुराज थोरात व हर्षल भुतांबरे यांच्यासह दुपारी 4 वाजेच्या सुमारास आंघोळीसाठी गंगामाई घाटावर आले. आंघोळीसाठी ते नदीपात्रात उतरले. त्यातील निलेश अस्वले व अमोल घाणे हे नदीपात्राच्या मध्यावर गेले आणि दोघेही पाण्यात बुडू लागले. त्यांनी आरडाओरड केली मात्र क्षणात ते दोघेही पाण्याखाली गेले.
सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास दोघांचे मृतदेह हाती लागले. याबाबत माधव संतू अस्वले (रा. अकोले) यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 58/2023 प्रमाणे नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मुथरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल पारधी करत आहेत.