अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
2025 हे वर्षे सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे वर्ष ठरणार आहे. 2024 ला लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुका पार पडल्या. आता 2025 जानेवारी महिना सरत आला असून फेबु्रवारी अखेर जिल्ह्यातील तीन बड्या आणि राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या असणार्या साखर कारखान्यांच्या निवडणुकांची तयारी सुरू होणार आहे. यात संगमनेरच्या थोरात सहकारी साखर कारखाना, लोणीच्या प्रवरा व राहुरीच्या डॉ.तनपुरे साखर कारखान्यांच्या निवडणुकांचा समावेश आहे. यासाठी नगरच्या सहकार विभागाच्यावतीने निवडणूक पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी फेब्रुवारी महिन्यांच्या तिसर्या आठवड्यात सभासदांची यादी मागविण्यात आली आहे.
दरम्यान, हे तीनही साखर कारखाने जिल्ह्यातील बड्या राजकीय नेत्यांशी निगडीत असून यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात पुन्हा राजकीय संघर्ष पहावयास मिळणार आहे. मार्च महिना धुलिवंदनाचा असून या महिन्यात जिल्ह्यातील बड्या राजकीय नेत्यांमध्ये सहकारातील राजकारणाची धुळवड रंगणार आहे. काही महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता जिल्ह्याच्या सहकारावर कोणाचे वर्चस्व राहणार याची रंगीत तालिमच या तीनही साखर कारखान्याच्या निवडणुकीत दिसून येणार आहे. नगर जिल्हा हा सहकार आणि साखर कारखान्यांच्या पंढरीचा जिल्हा असून या ठिकाणी प्रत्येक तालुक्यात स्थानिक नेत्यांचे वर्चस्व राहिलेले आहे. या ठिकाणच्या नेत्यांच्या राजकीय नाड्या आणि विचार वेगवेगळे असले तरी सहकारी संस्थांच्या निवडणुकीत सर्वांनी सोयीचे राजकारण केले असल्याचे आतापर्यंतचे चित्र आहे. ‘सहकारा’च्या राजकारणात पक्षीय जोडेबाजूला ठेवून सहकारी संस्थाच्या निवडणुका झाल्या असल्याचे दिसून आलेले आहे.
संगमनेर तालुक्यात विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाल्यानंतर तालुक्यातील त्यांचे समर्थक कार्यकर्ते पेटून उठलेले असून त्याचे परिणाम थोरात कारखान्यांच्या निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे तालुक्यातील सर्वोच्च सहकारी संस्था असणार्या कारखान्यावर ताबा घेण्यासाठी विरोधक ताकद लावतील असा अंदाज आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे वर्चस्व असणार्या लोणीच्या प्रवरा साखर कारखान्यांची निवडणूक याचदरम्यान होणार आहे. या निवडणुकीत विखे विरोधकांना कोण ताकद देणार, विखे यांच्या कारखान्यांत विरोधी नेते हस्तक्षेप करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. गणेश कारखान्यांचा निकालानंतर सावध झालेले विखे पाटील प्रवरा कारखान्यांच्या निवडणुकीत कशी काळजी घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
थोरात, विखे यांच्या कारखान्याप्रमाणे राहुरीचा डॉ. तनपुरे कारखाना महत्त्वाचा असून याठिकाणी सध्या विखे यांचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी विखे प्रयत्न करतील, तसेच या संस्थेवर ताबा मिळविण्यासाठी विरोधी महाविकास आघाडीचे नेते कंबर कसणार का? त्यात त्यांना यश येणार का? राहुरीला गतवैभव प्राप्त होणार का? असे एक ना अनेक प्रश्न या कारखान्याच्या निवडणुकीत राहणार आहेत. डॉ. तनपुरे कारखान्यांची 2016 पासून निवडणूक झालेली नसल्याने यंदाची निवडणूक चुरशीची होणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे. या तीन कारखान्यांच्या निवडणुकीमुळे संगमनेर, राहाता आणि राहुरी तालुक्याचे सहकाराचे राजकारण मात्र चांगलेच तपासणार आहे. राज्यात महायुतीचे सरकार असून नगर जिल्ह्याचे पालकत्व हे विखे पाटील यांच्याकडे आहे. ते या तीनही कारखान्यांच्या निवडणुकीत कशी फिल्डींग लावणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या तीनही मोठ्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी सहकार विभाग आतापासून तयारीला लागले आहे.
दोघांचे 17 पर्यंत, तर तनपुरेचा ठराव 21 तारखेला
निवडणुका होणार्या संगमनेर कारखान्याचे ब वर्ग मतदार असणार्या कारखाना संलग्न सोसायटी मतदारसंघातून 73, विखे पाटील कारखान्याचे 45 ठराव सहकार विभागाला प्राप्त झाले आहेत. या दोनही कारखान्याच्या मतदार याद्या 17 फेब्रुवारीपर्यंत तर तनपुरे कारखान्यांची मतदार यादी व ठराव 21 फेब्रुवारीपर्यंत मागविण्यात आले आहेत. या याद्या आल्यानंतर साधारण 15 दिवसांत प्रारूप मतदार यादी प्रसिध्दीचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे सहकार विभागाच्या सुत्रांनी सांगितले.
15 ते 30 मार्चदरम्यान रणधुमाळी
जिल्ह्यातील बड्या आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असणार्या संगमनेर, प्रवरा आणि राहुरी कारखान्यांसाठी साधारणपणे 15 ते 30 मार्च दरम्यान निवडणुका होण्याचा अंदाज आहे. या काळात स्थानिक स्वराज्य संस्था जाहीर न झाल्यास या कारखान्यांच्या निवडणुका या निर्विघ्न पार पडतील, असा विश्वास सहकार विभागाला आहे.