संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यात अवैधरित्या वाळू उपसा करणार्या वाळूतस्करांविरोधात महसूल व पोलीस प्रशासनाने धडक मोहीम उघडत सलग दोन दिवस कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील म्हाळुंगी नदीपात्र आणि रायते येथील प्रवरा नदीपात्रात करण्यात आलेल्या या संयुक्त कारवाईत दोघांना पाठलाग करुन अटक करण्यात आली असून पोकलेन यंत्रासह सुमारे 30 ते 35 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीपात्रात आठ ते दहाजण अवैधरित्या वाळू उत्खनन करून ती गोण्यांमध्ये भरून ऑटोरिक्षामधून चोरीने वाहतूक करत असल्याची खात्रीशीर माहिती तहसीलदार धीरज मांजरे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश देत स्वतः घटनास्थळी हजर राहून महसूल व पोलीस पथकासह शांतीघाट परिसरात धडक दिली. या पथकात मंडलाधिकारी जाफर पठाण, ग्राम महसूल अधिकारी सचिन बोरकर, प्रवीण ढोले, वैभव गुंजाळ तसेच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी विजय खुळे व बेनके यांचा समावेश होता. पथक नदीपात्रात पोहोचताच आरोपींनी वाळूने भरलेली ऑटोरिक्षा तिथेच सोडून पळ काढला.
मात्र तहसीलदार मांजरे व पोलिसांनी पाठलाग करत ऊसाच्या शेतात लपण्याचा प्रयत्न करणार्या सर्फराज रियाज शेख (वय 38) व सलीम जहीर शेख (वय 39) या दोघांना शिताफीने ताब्यात घेतले. उर्वरित आठजण फरार झाले. याप्रकरणी महसूल विभागाने वाळूने भरलेली ऑटोरिक्षा जप्त केली असून मंडलाधिकारी जाफर पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी दोघांसह फरार आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच रविवारी (दि.18) सकाळी रायते येथील प्रवरा नदीपात्रात कारवाई केली आहे.
घरकुल योजनेच्या नावाखाली पोकलेनच्या साह्याने मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती गुप्त खबर्यामार्फत तहसीलदार मांजरे यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने सकाळीच नदीपात्रात धडक देत अवैध उत्खनन सुरू असतानाच पोकलेन मशीनसह सुमारे 100 ब्रास वाळूसाठा जप्त केला. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या पोकलेन यंत्रासह वाळूसाठ्याची किंमत अंदाजे 30 ते 35 लाख रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.




