संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner
संगमनेर शहरामध्ये गुटख्यावरून बुधवारी रात्री जोरदार घडामोडी घडल्या. शहरात आलेल्या 80 पोते गुटख्यावर कारवाई करण्यात आली. मात्र ही पोते गायब झाल्याची चर्चा आहे. यावेळी झालेल्या वादावादीमध्ये एका तरुणाने गावठी कट्ट्याचा वापर केल्याचेही समजते. याबाबत अधिक माहिती अशी, संगमनेर शहरातील रहेमतनगरमध्ये बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास एका टेम्पोमध्ये 80 गुटख्याची पोते आणण्यात आले होते. हा एका गुटखा विक्रेत्याचा माल होता. गुटख्याची विल्हेवाट लावली जात असताना येथे वादावादी सुरू झाली.
या वादावादीमधून एकाने गावठी कट्टा बाहेर काढला. यानंतर येथे मोठी गर्दी जमा झाली. दरम्यान यावेळी एका माजी नगरसेवकाने ही माहिती अहमदनगरच्या पोलीस पथकाला दिली. हे पोलीस रात्रीच शहरामध्ये पोहोचले. त्यांनी गुटख्याची गाडी जप्त केली. यानंतर ही गाडी कोठे गेली याची कोणालाही कल्पना नाही. यामुळे 80 पोते गुटखा गायब झाल्याने शहरामध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्याशी संपर्क साधला असता, या घटनेची आपणास कोणतीही कल्पना नाही. अशी घटना घडली असल्यास या घटनेची सखोल चौकशी करून संबंधिताविरुद्ध कठोर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.