संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
शहरातील मदिनानगर परिसरातील गल्ली क्रमांक चारमध्ये सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यावर संगमनेर शहर पोलिसांनी धाडसी कारवाई करत कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या गोवंश जनावरांची सुटका केली. या कारवाईत तब्बल 700 किलो गोमांस जप्त करण्यात आले असून, एकूण 2 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ही कारवाई रविवारी (दि.21) मध्यरात्री सव्वाएक वाजेच्या सुमारास करण्यात आली.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मदिनानगर गल्ली क्रमांक चारमध्ये गोवंश जनावरे व वासरे कत्तलीच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या बांधून ठेवण्यात आल्याची माहिती गुप्त खबर्यामार्फत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी तातडीने पोलीस पथकासह घटनास्थळी छापा टाकला. छाप्यादरम्यान पोलिसांनी गोवंश जनावरांची सुरक्षित सुटका केली. तसेच कत्तल केलेले 700 किलो गोमांस जप्त केले. या कारवाईत गोमांस, जनावरे व इतर साहित्य असा एकूण 2 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सागर नागरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फारूख युसूफ सय्यद याच्यासह इतर पाच अनोळखी इसमांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सहाणे करीत आहेत. शहरात यापूर्वीही अवैध कत्तलखान्यांवर कारवाया करण्यात आल्या असल्या तरी छुप्या पद्धतीने असे कत्तलखाने पुन्हा सुरू होत असल्याचे वारंवार समोर येत आहे. त्यामुळे संगमनेर शहरातील अवैध कत्तलखाने कायमस्वरूपी बंद कधी होणार? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
संगमनेर शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यांचा मुद्दा आमदार अमोल खताळ यांनी यापूर्वीच विधानसभेच्या अधिवेशनात ठामपणे उपस्थित केला होता. या कत्तलखान्यांची कार्यपद्धती, त्यातून निर्माण होणारे आरोग्याचे धोके आणि कायद्याला हरताळ फासून सुरू असलेला हा प्रकार त्यांनी सविस्तरपणे सभागृहासमोर मांडला होता. मात्र, एवढे होऊनही आजही शहरात छुप्या पद्धतीने बेकायदेशीर कत्तलखाने सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.




