Wednesday, October 16, 2024
Homeनगरसंगमनेर तहसिलच्या महसूल यंत्रणेवर रिक्त पदांमुळे अतिरिक्त ताण

संगमनेर तहसिलच्या महसूल यंत्रणेवर रिक्त पदांमुळे अतिरिक्त ताण

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात महसुली उत्पन्न देणारा व विस्ताराने मोठा असलेल्या संगमनेर तालुक्यामध्ये 176 गावे समाविष्ट आहे. संगमनेर तालुक्याचा महसूल कारभार हाकणार्‍या तहसील कार्यालयावर रिक्त पदे व अनुभवी अधिकारी यांच्या बदलीमुळे प्रचंड ताण तणाव येत आहे. यामध्ये निवासी नायब तहसीलदार गणेश तळेकर यांची तीन महिन्यांपूर्वी मावळ येथे बदली झाली तर संजय गांधीचे नायब तहसीलदार यांची शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा वर्ग झाले आहे तर महसुल नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांची तहसीलदारपदी पदोन्नती झाल्याने येथील या अनुभवी अधिकार्‍यांच्या एकाच वेळी झालेल्या बदल्यामुळे महसूल यंत्रणाच लंगडी झालेली दिसत आहे.

- Advertisement -

महसूल विभाग म्हटले की जनतेचा तेथे नेहमीच संपर्क येतो. गोरगरीब जनतेपासून श्रीमंत लोकही या विभागाशी कायमच जोडलेले असतात. त्यामुळे या विभागाला मोठे महत्त्व आहे. मात्र, संगमनेर तहसील कार्यालयात विविध शाखेतील महत्त्वाचे पदे रिक्त आहेत. त्यामुळे येथे दैनंदिन कामकाजाचा गाडा हाकताना वरिष्ठांपासून कनिष्ठापर्यंत सर्वांनाच ताण-तणावातून जावे लागत आहे. विविध दाखल्यांपासून महसुली कामांसाठी कार्यालयातील प्रत्येक टेबलावरील अधिकार्‍यांसमोर लोकांची उपस्थिती पाहायला मिळते. मात्र, अतिरिक्त कामामुळे जनतेची कामे वेळेत पूर्ण करताना अधिकार्‍यांची तारांबळ उडत आहे.

यामध्ये विविध विभागांमध्ये महत्त्वाची असलेली रिक्तपदे महसूल सहाय्यक 4 पदे. तर अव्वल कारकून 1, मंडलअधिकारी 1. तलाठी 31 अशी पदे रिक्त असल्याने त्यामुळे महत्वाची व जनतेची कामे वेळेत होत नसल्याने खेड्या-पाड्यातून येणारे सर्वसामान्य माणसं हिरमुसून आल्या पावली घरी परत जातात. तहसील कार्यालयात असलेल्या तीन नायब तहसीलदारांपैकी 3 नायब तहसीलदारपदी अनुभवी अधिकार्‍यांची येथे गरज असताना देखील दोन परिविक्षाधीन महिला अधिकार्‍यांची नियुक्ती केल्याने कामे रेंगाळत आहे. येथील लोकप्रतिनिधी आमदार बाळासाहेब थोरात यांनी महसूल मंत्रीपद भूषविलेले आहे. तर सध्या त्यांचे कट्टर विरोधक ना. राधाकृष्ण विखे यांच्याकडे महसूल मंत्री पदाची धुरा आहे. दोन मातब्बर नेते असतानाही तहसील कार्यालयातील पदे रिक्त असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

गेल्या चार-पाच महिन्यांपूर्वी धीरज मांजरे यांनी तहसीलदार पदाची सूत्रे हाती घेतली. परंतू, त्यांच्यासाठी नवखा तालुका असल्याने व येथील सर्व अनुभवी अधिकार्‍यांच्या बदलीने त्यांची चांगलीच कसरत होताना दिसत आहे. विशेष म्हणजे संगमनेरचा राज्यात वेगळा लौकिक आहे. तरी देखील येथील महसूल विभागाची अशी अवस्था असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यात लक्ष घालण्याची गरज आहे. जर रिक्त पदे भरली तर नक्कीच कामाला गती मिळेल आणि नागरिकांना काम झाल्याबद्दल समाधान मिळेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या