संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
शहरातील एका इमारतीच्या गच्चीवर अवैधरित्या सुरू असलेल्या ताडी विक्री केंद्रावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी (दि.16) सकाळी धडक छापा टाकून तब्बल 980 लिटर ताडी जप्त केली. विशेष म्हणजे कोणालाही संशय येऊ नये म्हणून ताडी एक-एक लिटरच्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये लपवून ठेवण्यात आली होती. या कारवाईमुळे शहरासह तालुक्यात सुरू असलेल्या अवैध ताडी व्यवसायावर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका इमारतीच्या गच्चीवर आकाश रमेश शिंदे (वय 30, रा. संगमनेर) हा अवैधरित्या ताडी विक्री करत असल्याची माहिती गुप्त खबर्यामार्फत विभागाला मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक वाय. आर. सावखेडकर यांच्यासह उपनिरीक्षक गोकुळ नायकोडी, दुय्यम निरीक्षक प्राची देखणे, विपुल कर्पे, दत्ता खाडे, वसंत पालवे, विमल घोलप, स्वाती फटांगरे, मोहिनी घोडेकर आणि सरस्वती वराट यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. छाप्यात 810 लिटर ताडी एक-एक लिटरच्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून 27 प्लास्टिक गोण्यांमध्ये विक्रीसाठी साठवून ठेवलेली आढळली. याशिवाय 35 लिटर क्षमतेचे दोन ड्रम भरलेले, तसेच 200 लिटर क्षमतेच्या एका ड्रममध्ये 100 लिटर ताडी आढळून आली. अशाप्रकारे एकूण 980 लिटर ताडी जप्त करण्यात आली.
दरम्यान, अवघ्या तीन-चार दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने घारगाव येथेही राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करून 220 लिटर ताडी जप्त केली होती. सलग होत असलेल्या या कारवायांमुळे संगमनेर तालुक्यात अवैधरित्या ताडी विक्रीचे जाळे सक्रिय असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून, अशा व्यवसायाविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने आणखी तीव्र कारवाई करण्याची गरज आहे.




