संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून तालुक्यात राज्यात सर्वाधिक दुचाकी वाहने आहेत. संगमनेरसह अकोले तालुक्यातील नागरिकांना परिवहन कार्यालयाच्या सुविधांसाठी श्रीरामपूर येथे जावे लागते. यामुळे त्यांची मोठी गैरसोय होते. यामुळे माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरला स्वतंत्र परिवहन कार्यालय व्हावे, यासाठी पाठपुरावा केला होता. याबाबत आता आ. सत्यजीत तांबे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांकडे पाठपुरावा करून तातडीने हे कार्यालय सुरू करण्याची मागणी केली आहे.
संगमनेर आणि अकोले तालुक्यातील नागरिकांना वाहतूक सुविधांसाठी श्रीरामपूरपर्यंत प्रवास करावा लागतो. ही मोठी अडचण लक्षात घेऊन आम्ही 31 ऑक्टोबर 2023 रोजी या कार्यालयाबाबत सरकारदरबारी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार 22 जुलै 2024 रोजी कायमस्वरूपी सदर कार्यालयास मंजुरी मिळाली आहे. मात्र याबाबत अद्याप कार्यवाही झाली नाही. त्यामुळे सरकारने तातडीने येथे स्वतंत्र आरटीओ कार्यालय सुरू करावे, अशी मागणी केली असून या मागणीला परिवहन मंत्री व उपमुख्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
संगमनेर येथे स्वतंत्र परिवहन कार्यालयासाठी आ.सत्यजीत तांबेंनी 2023 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यासंदर्भात निवेदन दिले होते. आ. तांबे यांनी विभागीय परिवहन अधिकारी, गृह व परिवहन विभाग तसेच महाराष्ट्र सरकारच्या संबंधित अधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरवा सुरू ठेवला. मार्च 2025 मध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना देखील याबाबत निवेदन दिले आहे.