संगमनेर । शहर प्रतिनिधी
तालुक्यातील देवगाव येथील पानोबा वस्तीवर मका तोडण्यासाठी गेलेल्या महिलेवर नरभक्षक बिबट्याने हल्ला केला. यामध्ये ३५ वर्षीय महिलेच्या मानेवर व डोक्यावर दात लागल्याने ती जागीच ठार झाली.
काल शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. योगीता आकाश पानसरे (रा. देवगाव, ता. संगमनेर) असे मयत महिलेचे नाव आहे. दरम्यान, याच गावात महिन्यापूर्वी महिलेवर हल्ला करुन ठार केल्याची घटना घडलेली आहे. यामुळे वन विभागाबाबत नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
देवगाव गावातील मयत योगीता व पती आकाश हे शेती करून दुग्ध व्यवसाय करत आहे. नेहमीप्रमाणे शुक्रवारी देखील काम सुरू होते. गायांना चारा पाणी केले. त्यानंतर घरातील सर्व कामे आवरून योगीता या घराशेजारील मकाच्या शेतात गेल्या. तेथे बिबट्या दबा धरून बसला होता. त्याची थोडीशीही चाहूल लागली नाही. शुक्रवार (दि. ११) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास त्या कामात व्यस्त असताना बिबट्याने त्यांच्यावर झडप मारली.
याचवेळी मकाच्या शेताशेजारी काही महिला घास कापत होत्या. त्यांनी हा आवाज ऐकल्यानंतर आरडाओरडा केला. परंतु, मकाच्या शेतामध्ये जाण्याची कोणाची हिंमत झाली नाही. या महिलेला बिबट्याने सुमारे पन्नास मीटरपर्यंत ओढीत नेले होते. ग्रामस्थांनी मोठमोठ्याने आवाज केल्याने बिबट्याने महिलेला मकाच्या शेतात सोडून पलायन केले. मात्र, तोपर्यंत महिलेने जीव गमावला होता.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा मुक्त संचार वाढण्यासह हल्लेही वाढले आहेत. यामुळे वन विभागाबाबत नागरिकांतून संताप व्यक्त होत असून, ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.