Saturday, May 18, 2024
Homeनगरअधिकारी सुस्त, वाळूतस्कर मस्त

अधिकारी सुस्त, वाळूतस्कर मस्त

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

शहर व तालुक्यातील प्रवरा, मुळा, म्हाळुंगी, आढळा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत आहे.

- Advertisement -

वाळू उपसा झाल्याने नदीपात्र खडकाला भिडले आहे. या वाळू तस्करीकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे. संगमनेर शहर व तालुक्यात अधिकारी सुस्त, वाळू तस्कर मस्त तर वाळूच्या माध्यमातून मजुरी करणारे मजूर हे वाम मार्गाला लागल्याने या मजुरांचा संसार मात्र उद्ध्वस्त होत असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.

महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फायदा घेऊन कमी कालावधीत जास्तीत जास्त मिळकत मिळतेय म्हणून अनेकजण या वाळू व्यवसायात उतरले आहेत. या व्यवसायातून मालामाल झालेले वाळूतस्कर कोणालाही जुमानायला तयार नाहीत. त्यांची दादागिरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाळू तस्करांना कोणी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर त्याला मारहाण केली जाते.

सर्वसामान्य नागरिकालाच काय तर महसूलच्या अधिकार्‍यांनाही या वाळूतस्करांनी सोडले नाही. या वाळू तस्करांवर कोणाचाही वचक राहिला नसल्याचे चित्र आहे. महसूल प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही. रस्त्याने जाता-येता एखाद्या वाळू तस्कराचे वाहन मिळाले तरच त्याच्यावर कारवाई केली जाते. वाळू तस्करांचा अधिकार्‍यांना धाक की अधिकार्‍यांना वाळू तस्करांना धाक अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.

वाळूची वाहतूक करताना आपले वाहन पकडले तरी अल्प नुकसान होईल असे वाहन वाळू तस्कर वापरताना दिसत आहे. यातून मोठ्या प्रमाणात अपघातही होतात. विनानंबर, मोडतोड झालेल्या रिक्षा, जीप यांचा वापर सर्रासपणे होत आहे. अनेक शेतकर्‍यांच्या घराजवळ काचा फुटलेल्या जीपा उभ्या असतात.

या जीप शेतकर्‍याच्या नसून वाळू तस्करांच्या असतात. याच जीपमधून मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक होत असते. बैलगाडीतूनही मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक होत आहे. तालुक्यातील मंगळापूर परिसरातील प्रवरा व आढळा नदीपात्रातून रात्रीच्या सुमारास बैलगाडी व जीप सारख्या वाहनातून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा होत आहे. अकोले रोडपासून तीन किलोमीटर अंतरावर नदीपात्र असल्याने महसूलचे अधिकारी सहसा फिरकत नाहीत.

याचा गैरफायदा घेऊन वाळूतस्कर मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा करताना दिसत आहेत. गावातील नागरिक वाळू तस्करांना विरोध करताना दिसत नाही. यामुळे नदीपात्रात मोठ मोठे खड्डे पडले आहेत. गेल्या वर्षा -दीड वर्षांपूर्वी याच नदीपात्रातील खड्ड्यांमध्ये पडून तीन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. असे असतानाही या वाळू तस्करांवर कोणाचे लक्ष नसल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

बैलगाडीने वाळूची वाहतूक करणार्‍यावर थातूरमातूर दंडात्मक कारवाई करुन सोडून दिले जाते. बैलगाडीवर कारवाई करताना हे बैल अधिकार्‍यांनी पांजरपोळात जमा करून बैलगाडी ताब्यात घेतली तरच वाळू तस्करीवर काही प्रमाणात निर्बंध येतील अशी नागरिकांची मागणी आहे. नवीन अधिकारी आल्याने नर्सरीतून वाळू उपसा बंद आहे.

प्रवरानदीपात्रातून वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणार्‍या खांडगाव येथील तिघांना 20 लाख रुपयांचा दंड काल ठोठावण्यात आला आहे. त्यांच्याकडील वाहनेही महसूल खात्याने जप्त केली आहेत. असे असतानाही परिसरात वाळू उपसा होत असल्याचे चित्र आहे.

रात्रीच्या सुमारास वाळूचा उपसा होत असल्याने मजुरीने काम करणारे मजूर वाम मार्गाला लागले आहे. कमी श्रमात जास्त पैसे मिळत असल्याने हे मजूर व्यसनी बनले आहे. मजूरीतून आलेल्या पैशांचा वापर दारु, गांजा, मटका, जुगार यात होत आहे. हा कमविलेला पैसा संसाराला उपयोगी पडत नसल्याने संसार उध्वस्त होत असल्याचे चित्र आहे.

तालुक्यात वाळू तस्करांची संख्या वाढत असून कमी श्रमात पैसे मिळत असल्याने अनेकजण मुंबई येथील कलाकेंद्रांची वारी करत असल्याचे बोलले जात आहे. जिल्हाधिकार्‍यांनी या प्रश्नात गंभीरपणे लक्ष घालण्याची गरज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या