मुंबई । Mumbai
काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकत आपल्या पुढील राजकीय वाटचालीसाठी भाजपची वाट धरली आहे. त्यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिला असून, येत्या २२ एप्रिल रोजी अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
मुंबईतील भाजप मुख्यालयात होणाऱ्या या प्रवेश सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम भाजपसाठी महत्त्वपूर्ण मानला जात असून, पुणे जिल्ह्यातील राजकारणात यामुळे नव्या घडामोडी घडू शकतात. राजीनाम्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत संग्राम थोपटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. काँग्रेस सोडताना मनात खंत असल्याचे त्यांनी मान्य केले, मात्र ही वेळ पक्षाच्या वागणुकीमुळेच ओढवली असल्याचेही ते म्हणाले.
“पक्षाने मला एकदाही संधी दिली नाही. कार्याध्यक्षपद, विरोधी पक्षनेतेपद या संधींपासून मला वंचित ठेवलं गेलं. सातत्याने डावलण्यात आलं. त्यामुळे भाजपमध्येच न्याय मिळेल असं वाटलं,” असं थोपटे यांनी ठामपणे सांगितलं. महाविकास आघाडीला सत्ता मिळाल्यानंतर काँग्रेसकडे १२ मंत्रिपदे होती. मात्र, त्या काळातही थोपटे यांना मंत्रिपद मिळाले नाही. “पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतला म्हणून मी काम करत राहिलो. पण नंतरही काहीच मिळालं नाही,” अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.नाना पटोले यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याचीही भरपाई थोपटे यांना मिळालेली नाही. विरोधी पक्षनेतेपदासाठीही त्यांचा विचार न झाल्याचे त्यांनी नमूद केले.
पुणे जिल्ह्यातील राजकारणात संग्राम थोपटे यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. हा जिल्हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा असूनही काँग्रेसकडून त्यांना पाठबळ मिळालं नाही, असा आरोप त्यांनी केला. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या विजयी मोहिमेत थोपटे यांनी पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले. “धंगेकर यांचा विजय माझ्यामुळेच शक्य झाला. ही जबाबदारी माझ्यावर होती. मात्र त्यानंतरही पक्षाने माझ्याकडे दुर्लक्ष केलं,” असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजप प्रवेश हा कोणत्याही दबावाखाली घेतलेला निर्णय नसून, तो कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे घेतल्याचं थोपटे यांनी स्पष्ट केलं. “भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी माझ्या कार्यकर्त्यांनी अनेक वेळा आग्रह धरला. विकासकामांमध्ये अडथळे येत होते. त्यामुळे अनेक बैठका घेऊन हा निर्णय घेतला,” असे ते म्हणाले.
संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशामुळे पुणे जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. एकीकडे काँग्रेससाठी ही मोठी धक्का मानला जात असताना, दुसरीकडे भाजपला स्थानिक पातळीवर यामुळे अधिक बळ मिळण्याची शक्यता आहे. थोपटे यांचा अनुभव, कार्यकर्ता बेस आणि स्थानिक पातळीवरील पकड लक्षात घेता, भाजप त्यांच्या प्रवेशाचा मोठा राजकीय फायदा करून घेण्याचा प्रयत्न करेल. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश विशेष महत्त्वाचा मानला जातो.
संग्राम थोपटे यांचा काँग्रेसमधून भाजपमध्ये होणारा प्रवेश हा पक्षांतर्गत असंतोष आणि संधी न मिळाल्याच्या नाराजीचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. त्यांच्या आरोपांवर काँग्रेसकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, आगामी काळात या घडामोडींचा पुण्यातील राजकीय चित्रावर मोठा प्रभाव पडू शकतो.