Tuesday, November 26, 2024
Homeअग्रलेखपुरेशा जनजागृतीशिवाय स्वच्छता उपक्रम व्यर्थ!

पुरेशा जनजागृतीशिवाय स्वच्छता उपक्रम व्यर्थ!

मानवी जीवनात पाण्याला मोलाचे स्थान आहे. ‘पाणी हेच जीवन’ असे म्हणतात त्यामागचे कारण हेच असावे. पाणी उपलब्धता आणि पुरवठा सहजतेने व्हावा म्हणून मानवी वस्त्या नदीकाठांवर वसल्या. कालौघात त्यांचा विस्तार होऊन वस्त्यांची गावे आणि नंतर गावांची शहरेही झाली. नद्यांनी मानवी जीवन समृद्ध केले. वर्षानुवर्षे त्या वाहत आहेत. मानवी जीवनात सतत समृद्धी आणत आहेत. पिण्यापासून शेती सिंचनासह विविध कामांसाठी नद्यांच्या पाण्याचा यथेच्छ आणि अनिर्बंध वापर मानव शेकडो वर्षे करीत आहे, पण ‘जीवनधारा’ बनलेल्या नद्यांबाबत मानवाने किती जागरूकता दाखवली? मानवी जीवन निर्मळ आणि समृद्ध करणार्‍या नद्यांच्या आरोग्याबाबत स्वार्थी मानवाने सपशेल दुर्लक्षच केले. नद्यांना ‘माता’ म्हणणारा मानव जाणते-अजाणतेपणे नद्यांच्या मुळावर उठला आहे. नदी स्वच्छतेकडे मानवाचे सतत दुर्लक्ष होत आहे. नद्यांची हेळसांड थांबवण्यासाठी जनजागृती  आवश्यक आहे. ती गरज ओळखून जलबिरादरी संस्थेने पुढाकार घेतला आहे. लोकसहभागातून महाराष्ट्रातील गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा पश्‍चिम वाहिनी नदीखोर्‍यांतील 75 नद्यांना ‘अमृतवाहिनी’ करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून ‘चला जाणूया नदीला’ हा नाविण्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. 15 ऑक्टोबरपर्यंत तो चालणार आहे. माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी राज्यातील 75 नद्यांवर एकाचवेळी नदीयात्रा काढली जाणार आहे. या नद्यांमध्ये नाशिक जिल्ह्यातील नंदिनी, कपिला, वरूणा, वालदेवी, अगस्ती, मोती आदी नद्यांचा समावेश आहे. उपक्रमात नदी अभ्यासक, नदीप्रेमी, शेतकरी, विद्यार्थी तसेच सरकारी यंत्रणांचे अधिकारी यांना सहभागी करून घेतले जाणार आहे. 75 नद्यांसाठी 110 जलनायक कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह आणि जलबिरादरीचे ब्रँड अँबेसिडर अभिनेता चिन्मय उदगीर यांच्या उपस्थितीत त्यांच्याकडे जलकलश आणि ध्वज सुपूर्द केले जातील. महाराष्ट्र सरकारचे पाठबळ या उपक्रमाला मिळाले आहे. काळाची गरज आणि निसर्ग संवर्धनाचा भाग म्हणून राज्यातील सुजाण नागरिक व पर्यावरणाविषयी जागरूक तरुण या उपक्रमात हिरिरीने सहभागी होतील, अशी आशा बाळगता येईल. जीवनदायी असलेल्या नद्यांची सातत्याने उपेक्षा होत आहे. परिणामी गंगा अथवा गोदावरी नद्यांच्या स्वच्छतेचे खर्चिक प्रकल्प हाती घेण्याची वेळ सरकारांवर आली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही नद्यांची परिस्थिती सुधारल्याचे अजूनतरी दिसत नाही. मानवाच्या चुकांमुळे नद्यांची पात्रे पावसाळा वगळता इतर काळात कोरडीठाक असतात. खेड्यांपासून मोठ्या शहरांपर्यंतचे सांडपाणी आणि केरकचरा सर्रास नद्यांमध्ये हक्काने टाकला जातो. त्याचा परिपाक म्हणजे नद्यांचे आरोग्य बिघडले आहे. ‘चला जाणूया नदीला’सारखे स्वागतार्ह उपक्रम जनजागृतीत मोलाची भूमिका बजावू शकतील, पण स्वत:च नदी विद्रुपीकरणाला हातभार लावणारे नागरिक अशा उपक्रमांत स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन केलेल्या पापाचे प्रायश्‍चित्त घेतील का? स्वच्छता आणि नागरी आरोग्याचा परस्पर संबंध आहे. त्यामुळे नुसती घरे स्वच्छ करून भागणार नाही. परिसर, गाव आणि शहर स्वच्छतेलाही तेवढेच महत्त्व आहे. स्वच्छता कार्यात जनसहभाग वाढवण्यासाठी देशपातळीवर महात्मा गांधी जयंतीला स्वच्छता अभियान राबवले जाते. दरवर्षी राज्ये, गावे, शहरे यांच्यासाठी स्वच्छता स्पर्धा घेतली जाते. यंदाच्या स्पर्धेत महाराष्ट्राने देशात तिसरा क्रमांक मिळवला. मोठ्या शहरांच्या गटात वरचे स्थान पटकावण्याच्या निर्धाराने स्पर्धेत उतरलेल्या नाशिकची 14 व्या स्थानावरून 20व्या स्थानावर घसरण झाली. याउलट नजिकच्या देवळाली कँटोन्मेट बोर्डाने देशात अव्वलस्थान पटकावले. नाशिक हे तीर्थक्षेत्र आहे. गोदापात्रात स्नान करून व पापमुक्त होऊन पुण्यप्राप्तीसाठी हजारो भाविकांचा ओघ नाशिकमध्ये दररोज सुरू असतो. पुण्यभूमी असल्याने स्वच्छतेबाबत बहुतेक नागरिक दुर्लक्ष करतात. भाविकांची श्रद्धा असलेल्या रामकुंडात आणि गोदापात्रात दुतर्फा केरकचरा आणि पूजाविधीनंतर निर्माल्य टाकण्याचे पुण्यकर्म लोक हक्काने करतात. तीर्थक्षेत्र असल्याने येथे अनेक चांगल्या कल्पनांचा बोजवारा उडाल्याचे पाहावयास मिळते. कोणी कितीही कानीकपाळी ओरडले, मनपाने नियम केले, सूचनाफलक लावले अथवा दंडाची तरतूद केली तरीही त्याला कोणी जुमानत नाही. नाशकातील कचरा व्यवस्थापनासाठी घंटागाड्यांवर मनपा दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. शहरात सर्वत्र घंटागाड्या धावत असतात. तरीसुद्धा कचरा घंटागाडीत टाकण्याचे कष्ट न घेता सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यांच्या कडेला अनेक जण कचरा टाकतात. स्वच्छतेत वरचा क्रमांक मिळवण्याचे मनपाचे प्रयत्न कदाचित यामुळेच फसले असावेत. स्वच्छतेबाबत लोकांना जागरूक करणे सोपे काम नाही. तरीसुद्धा स्वच्छतेबाबत शहराचे जबाबदार नागरिक म्हणून नाशिककर आता तरी जागरूकता बाळगतील, अशी अपेक्षा करूया!

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या