Wednesday, May 6, 2026
HomeराजकीयSanjay Gaikwad : मी जे केलं ते मला मान्य, संजय गायकवाड मारहाणीवर...

Sanjay Gaikwad : मी जे केलं ते मला मान्य, संजय गायकवाड मारहाणीवर ठाम!

मुंबई । Mumbai

आमदार निवासमधील कॅन्टीनमध्ये मिळालेल्या निकृष्ट आणि सडलेल्या जेवणावरून शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी थेट कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. यासंबंधीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, या प्रकारावर विधानपरिषदेत विरोधकांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. विरोधकांनी आमदार गायकवाड यांच्यावर निलंबनाची मागणी केली आहे.

- Advertisement -

घटनेनंतर माध्यमांशी बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी आपली बाजू स्पष्ट केली. “मंगळवारी रात्री १० वाजता मी रोजच्या प्रमाणे दोन चपाती, डाळ आणि भाताची ऑर्डर दिली होती. एक घास घेतल्यानंतर अन्न खराब असल्याचं जाणवलं, आणि दुसऱ्या घासानंतर मला थेट उलटी झाली. त्यानंतर मी कँटीनमध्ये गेलो आणि कर्मचाऱ्याला विचारलं की हे जेवण कोणी दिलं, त्यांना बोलवा,” असं गायकवाड यांनी सांगितलं.

गायकवाड पुढे म्हणाले, “मी डाळ थेट मॅनेजरला दाखवली. इतर जेवणाऱ्या लोकांनाही दाखवली. सगळ्यांनी एकमताने सांगितलं की ही डाळ सडलेली आहे. नुसतं निकृष्ट नाही, तर सडलेलं अन्न आम्हाला दिलं गेलं होतं. किचनमध्ये उंदीर फिरतात, साफसफाई नाही. गेली ३० वर्षं हा ठेकेदार तिथं काम करत आहे आणि हीच अवस्था आहे.”

“मी त्या कर्मचाऱ्याला अनेक वेळा समजावलं. हिंदी, इंग्रजी, मराठीतून विनंती केली की जेवण नीट दे. पण तो काही ऐकायला तयार नव्हता. म्हणूनच मला ‘शिवसेना स्टाईल’मध्ये उत्तर द्यावं लागलं,” असं स्पष्ट करत गायकवाड यांनी आपल्या कृतीचा कोणताही पश्चाताप नसल्याचं ठामपणे सांगितलं.

या घटनेवर विधानभवनात जोरदार चर्चा रंगली. विरोधकांनी आमदार गायकवाड यांचा निषेध करत त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची मागणी केली. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी दाखवलेली ही वृत्ती अत्यंत निंदनीय असल्याचं मत विरोधी पक्षनेत्यांनी मांडलं.

सोशल मीडियावर या घटनेबाबत जनतेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी गायकवाड यांच्या कृतीचा निषेध केला असून, काही लोकांनी कँटीनमधील अन्नाची खराब अवस्था याआधीही अनुभवल्याचे सांगितले आहे. काही आमदार आणि अधिकाऱ्यांनी देखील त्या अन्नावर नाराजी व्यक्त केल्याचं गायकवाड यांनी सांगितलं.

आमदार निवासासारख्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी जर अशा प्रकारचं सडलेलं अन्न दिलं जात असेल, तर संबंधित व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. मात्र, त्याविरोधात आवाज उठवताना मारहाणीचा मार्ग स्वीकारणं कितपत योग्य आहे, यावर समाजात मतमतांतर निर्माण झाली आहेत. आता या प्रकरणावर सरकार काय भूमिका घेते आणि प्रशासन कोणती कारवाई करते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ताज्या बातम्या

पंचवटीतील श्री काळाराम मंदिरावर फडकला धर्मध्वज

0
नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७-२८ च्या पार्श्वभूमीवर पंचवटीतील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात आज धर्मध्वज उभारणी सोहळा पार पडला. अयोध्येच्या धर्तीवर उभारलेल्या...