मुंबई | Mumbai
शिवसेना ठाकरे गटाने महायुतीतील भ्रष्ट मंत्र्यांविरोधात सोमवारी राज्यभरात आंदोलन केले होते. यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात देखील प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान मुंबईसह अनेक ठिकाणी पथनाट्य, घोषणाबाजी आणि नाट्यमय आंदोलने करण्यात आली. त्यामध्ये काही दिवसांपूर्वी गायकवाड यांनी केलेल्या कृत्याचं पथनाट्यात रूपांतर करून सादरीकरण करण्यात आलं. यावर प्रतिक्रिया देताना संजय गायकवाड यांनी ‘माझी कॉपी कोणीही करू शकत नाही. मी ओरिजनल आहे, इतकंच काय तर उबाठ्याचा बापही माझी कॉपी करू शकत नाही’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. संजय गायकवाड यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून संजय गायकवाड यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. यानंतर आता संजय गायकवाड यांनी आपल्या वक्तव्यावरून यू-टर्न घेतला आहे.
विरोधकांनी संजय गायकवाड यांच्यावर टीकास्त्र सोडले. खासदार विनायक राऊत यांनी तर थेट टीका करत म्हटले की, “गायकवाड यांची भाषा ही महाराष्ट्राच्या राजकारणातील घाणेरडी संस्कृती दाखवते. अशा लोकांच्या वक्तव्यामुळे जनतेत राजकारणाबद्दलची घृणा वाढते. महाराष्ट्रातील जनता त्यांना त्यांचा ‘बाप’ दाखवून देईल.” शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनीही प्रतिक्रिया देताना सांगितले, “त्यांची कॉपी करणे हे कोणत्याही सज्जन आणि कर्तबगार माणसाचे काम नाही. अशा शब्दांचा वापर करून लोकशाहीतील चर्चेची पातळी खालावली जाते.”अशी टीका त्यांनी केली.
आमदार संजय गायकवाडांचा यु-टर्न
महाराष्ट्रात आणि देशात काल महाविकास आघाडीच्या लोकांनी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतल्या आमदारांच्या विरोधात प्रतिकात्मक आंदोलन केले होते. त्यात माझ्या मतदारसंघात सुद्धा बॉक्सिंग मारतानाचा प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. याबाबत मला विचारले असता मी उत्तर दिले होते की. माझे प्रतिकात्मक आंदोलन करण्याची उभाठाच्या कार्यकर्त्याच्या बापाची अवकात नाही, असे म्हटले होते. तुम्ही डायरेक्ट बाळासाहेबांचे नाव केले. माझ्या शब्दाचा विपर्यास करण्यात आला. बाळासाहेब ठाकरे हे रक्ताने उद्धव साहेबांचे वडील आहेत. पण बाळासाहेब हे सर्वांचे दैवत आहे व सर्वांचे बाप आहेत. आम्हाला बाळासाहेब ठाकरेंचीच शिकवण आहे. मी उबाठाच्या कार्यकर्त्यांबाबत बोललो होतो, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
काय म्हणाले होते संजय गायकवाड?
संजय गायकवाड म्हणाले होते की, उबाठाच्या वतीने जे आंदोलन करण्यात आले, त्यांना काही काम राहिलेले नाही. ते माझी कॉपी करू शकत नाहीत, कारण मी ओरिजनल आहे. इतकेच काय तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बापालाही माझी कॉपी करणे जमणार नाही. विरोधी पक्षाने लोकांच्या प्रश्नावर आवाज उठवायला हवा. पण ते नको त्या गोष्टीवर आंदोलन करतात.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





