मुंबई | Mumbai
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालय आणि सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याविरोधात काही विधाने केली होती. त्याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून त्यांच्या वर्तवणूकीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने खासदार संजय राऊतांना स्पष्टीकरण मागितले आहे. यावरुन आता खासदार संजय राऊत यांनी माफी मागितली आहे. “माझ्या आयुष्यात मी कधीच कोर्टाचा अवमान केला नाही. रागाच्या भरात एखादा शब्द तोंडातून गेला असेल, तर मी माफी मागतो. एकदा नाही, मी दहादा सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो,” असे राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
काय म्हणाले संजय राऊत?
“आम्हाला आणि देशाला न्याय हवा आहे. SIR च्या नावाखाली देशातील 13 कोटी जनतेचे नाव मतदार यादीतून वगळले गेले त्यांना न्याय हवा आहे. ज्याप्रकारे आमचा पक्ष फोडला, आमचे चिन्ह दुसऱ्याला दिले गेले. त्याबद्दल 4 वर्षापासून आम्ही न्यायाच्या प्रतिक्षेत आहोत. त्यामुळे आम्हालाही न्याय हवा. त्यामुळे आमच्या मनात चीड येते. या रागात जर आमच्या तोंडून काही चुकीचे गेले असेल तर नक्कीच मी न्यायालयाची माफी मागेन. पण, या देशाची लोकशाही वाचवण्याची जबाबदारी न्यायालयाची आहे. आम्ही अखेरपर्यंत न्यायासाठी न्यायालयासमोर विनवणी करत राहू,” असेही खासदार राऊत पुढे म्हणाले.
हद्दपार गुन्हेगार थिरकला दांडियाच्या तालावर; पोलिसांच्या कारवाईनंतर रेकॉर्डवरील कावळे ताब्यात
सर्वोच्च न्यायालय संविधानाचे रक्षक असल्याचे आम्ही मानतो
खासदार संजय राऊत म्हटले की, “सर्वोच्च न्यायालय संविधानाचे रक्षक असल्याचे आम्ही मानतो. सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत काही गैरसमज व्हायला नको. देशात ज्याप्रकारे अराजकता माजली आहे. ते थांबवण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. आम्ही दबावात राहणार नाही असे न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी म्हटले, आम्हालाही तेच हवे आहे. कोणत्याही दबावाखाली न्यायालयाने राहू नये. आमदार, खासदार विकत घेतले जातात. पक्ष फोडून कोणालाही पक्षाची मालकी दिली जाते. काही जण स्वत: संविधानाचे मालक असल्यासारखे वागतात. त्यामुळे सरन्यायाधीशांसमोर आम्ही हात जोडून उभे राहतो,” असेही यावेळी ते म्हणाले.




