Sunday, September 8, 2024
Homeमुख्य बातम्याआराम करण्यासाठी मुख्यमंत्री झालात का?; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

आराम करण्यासाठी मुख्यमंत्री झालात का?; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे ते साताऱ्यातील दरे या गावी आराम करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जबरदस्ती रुग्णालयात दाखल करणार असल्याचं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. त्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.

- Advertisement -

एकनाथ शिंदेंना उद्देशून संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली हे मला कळलं. ते आराम करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किती आराम करत आहेत? उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या मुख्यमंत्र्याने आपण राज्यकारभार करायला मुख्यमंत्री झाला की आराम करायला मुख्यमंत्री झाला आहात याचा विचार करावा. आजच वाचलं आरामाला गेले आहेत. करू द्या, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला आहे.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, शिवसेना-भाजप युतीचा ‘मित्रकाळ’ 25 वर्षांचा होता व त्या मित्रकाळात मोदी-शहा कोठेच नव्हते. २०१४ सालात गुजरातची ही जोडी दिल्लीच्या राजकारणात अवतरली व त्यांनी ‘मित्रकाळ’ युती तो डली. मोदी २०१९ चा दाखला देतात, पण मुळात ‘युती’ २०१४ सालात भाजपने तोडली. विधानसभेच्या एका जागेवरून भाजपने युती तोडली. एकनाथ खडसे तेव्हा भाजपात होते व युती तोडत आहोत, असे उद्धव ठाकरे यांना अधिकृतपणे सांगण्याची जबाबदारी पक्षाने खडसेंवर सोपवली. खडसे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून ‘युती तोडत आहोत’ असे सांगितले. मोदी यांना हे माहीत नसावे? ते कोणाला चुकीची माहिती देत आहेत? २०१९ साली दिलेला शब्द पाळला नाही म्हणून दुसऱ्यांदा युती तुटली. संजय राऊत म्हणाले, २०१९ मध्ये एकनाथ शिंदे यांना अडीच वर्षे मुख्यमंत्री करा, असे उद्धव ठाकरेंचे म्हणणे होते. मात्र, तेव्हा भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास नकार दिला होता. त्यामुळे युती तुटली. आता त्याच शिंदेंना भाजपने मुख्यमंत्री केले. मोदी यांनी या घडामोडींवर भाष्य केले पाहिजे व खरे बोलायला हवे.

दरम्यान, केंद्राच्या गृहविभागाकडून यंदा महाराष्ट्रातील एकाही पोलिस कर्मचाऱ्याला शौर्यपदक देण्यात आले नसल्याचे वृत्त आहे. त्यावरूनही संजय राऊतांनी शिंदेंना धारेवर धरले. संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राच्या कर्तबगार, लोकप्रिय मुख्यमंत्र्यांनी यावर बोलायला हवे. केंद्राकडून, दिल्लीकडून महाराष्ट्राचा वारंवार अपमान होत आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, स्वाभिमानासाठी तरी शिंदेंनी तोंड उघडायला हवे होते. महाराष्ट्रातील महत्त्वाची कार्यालये गुजरातला हलवली जात आहेत. प्रकल्प पळवले जात आहे. यावर एकनाथ शिंदे बोलणार की नाही? आजारपणावरून उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्यांच्या गळ्यात गुलामगिरीचा पट्टा बांधला आहे. त्यावर त्यांनी आधी बोलायला हवे. असंही ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या