नाशिक | Nashik
देशासह महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका (Loksabha Election) होत असल्याने प्रचारादरम्यान सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. अशातच महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) उमेदवाराच्या प्रचारासाठी नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) आलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, “एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेचा (Shivsena) धनुष्यबाण चोरला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी टेम्पो भरून पैसे आणू द्या, त्याचा काहीही परिणाम होणार नाही. मोदी महाराष्ट्रात (Maharashtra)ठाण मांडून बसले आहेत. पंरतु, लोक त्यांना अजिबात मतदान (Voting) करणार नाहीत. नुकत्याच अजित पवारांच्या उमेदवारांच्या निवडणुका संपल्या असून ते आता मोकळे झाले आहेत. त्यानंतर आता शिंदेंच्या उमेदवारांच्या निवडणुका होत असल्याने ते धावपळ करत आहेत. मात्र, त्यांची ही शेवटची फडफड आहे, असं संजय राऊतांनी म्हटले.
तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबाबत बोलतांना राऊत म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ते राजकारणातील एकदम कच्च मडकं आहे. कॉपी करून पास होणाऱ्या लोकांसारखे ते आहेत. तसं हे मडकं आहे. आम्ही नारायण राणे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली होती आणि हरलो होतो. हे फडणवीस यांना माहीत नसेल. ते तेव्हा राजकारणात फार नव्हते, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. तसेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीला लोकसभेच्या किमान ३५ जागा मिळतील, असा दावाही यावेळी राऊत यांनी केला.
त्यासोबतच येत्या १४ तारखेला मी नाशिक महापालिकेच्या (Nashik NMC) ८०० कोटींच्या भूसंपादन घोटाळ्याचा खुलासा करणार आहे. यामध्ये कोण सहभागी आहेत, लाभार्थी आहेत, हे जनतेसमोर मांडणार आहे. या घोटाळ्यात मुख्यमंत्री, नगरविकास खाते आणि स्थानिक नेते सहभागी होते. ही लहान गोष्ट नाही. शेतकरी नसलेल्या बिल्डरांना भूसंपादनाच्या नावाखाली पैसे मिळाले. बिल्डर अचानक शेतकरी कसे झाले? त्यांना पैसे कसे मिळाले?’ असा सवालही संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच जनतेच्या पैशाची कोणी लुट करत असेल आणि नरेंद्र मोदी डोळ्याला पट्टी लावून बसत असतील तर त्यांना दाखवावे लागेल की तुम्ही किती खोटारडे आहात. मला त्यांना आता ईडी आणि सीबीआय कुठे आहे? असा प्रश्न विचारायचा आहे, असंही संजय राऊतांनी म्हटले.