मुंबई । Mumbai
उत्तर प्रदेशातील प्रयागराज या ठिकाणी जगातील सर्वात मोठ्या महाकुंभ मेळा संपन्न झाला. १३ जानेवारी सुरु झालेल्या या महाकुंभ मेळाच्या २६ फेब्रुवारीला सांगता झाली. या महाकुंभ मेळ्यात शाही स्नान करण्यासाठी देश-विदेशातील साधु, संत, महंत आणि भक्त आले होते.
४५ दिवस सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात अनेक भाविकांनी स्नान केले. या महाकुंभमेळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून विविध पक्षांचे राजकीय नेते, दिग्गज मंडळी, सेलिब्रिटी सहभागी झाले. मात्र या महाकुंभ मेळ्यात उद्धव ठाकरे सहभागी झाले नाहीत यावरु सध्या चर्चा सुरु आहे. यावरुन एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे महाकुंभला गेले नसल्याचं म्हटलं होतं.. आता याला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
‘एकनाथ शिंदे भ्रष्ट मंत्री, आमदारांच्या टोळीला घेऊन महाकुंभ मेळ्यात गेले. इकडे आल्यावर ते आम्हाला प्रश्न करतात की उद्धव ठाकरे महाकुंभला का गेले नाहीत, हिंदू असतील तर त्यांनी कुंभला जायला पाहिजे होते. आमच्याकडे होते तेव्हा त्यांना हिंदुत्वाचे चांगले ट्रेनिंग मिळायचे, ते आता संपले. त्यामुळे भाजप किंवा अमित शहांकडे हिंदुत्वाचे ट्रेनिंग स्कूल असेल तर शिंदेंना हिंदुत्वासंदर्भात व्यवस्थित ट्रेनिंग देऊन बोलायला शिकवायला पाहिजे. कारण कुंभला गेल्यावरच हिंदूत्व बळकट होते असे नाही. आमचे अनेक सहकारी तिथे जाऊ आले. कुंभला गेले नाहीत म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व संशयाच्या भोवऱ्यात टाकत असाल तर आपण कुंभला का गेला नाहीत हा प्रश्न शिंदेंनी सरसंघचालक मोहन भागवत यांना
विचारायला पाहिजे’, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला.
‘मोहन भागवत कुंभला गेले आणि स्नान करत आहेत, असा एकही फोटो किंवा व्हिडीओ मी पाहिला नाही. संघाचे इतर प्रमुख नेत्यांनाही प्रयागराजला जाऊन अंघोळ करताना आणि पुण्य प्राप्त करताना पाहिले नाही. अशा प्रकारच्या पुण्य प्राप्तीवर त्यांचा विश्वास नसावा’, असेही राऊत यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, ‘आम्ही मोहन भागवत यांना फॉलो करतो. आमचे ठरले होते, मोहन भागवत अंघोळीला गेले की त्यांच्या पाठोपाठ आपणही शाही स्नानाचा कार्यक्रम करायचा. पण भागवत गेलेच नाहीत. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे गेले, आम्ही त्यांच्या मागे का जायचे? आमच्यासाठी मोहन भागवत हे हिंदुत्वाचे आदर्श पुरुष आहेत.’
‘हेडगेवार, गोरवळकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, रज्जू भैय्या, सुदर्शनजी या पैकी कुणाचेही कुंभच्या सोहळ्यात स्नान करतानाचे फोटो मी आयुष्यात कधी पाहिले नाहीत. आम्ही कशाप्रकारे कुंभमध्ये सहभागी व्हावे म्हणून मी जुना इतिहास चाळण्याचा प्रयत्न केला, पण मला काही सापडले नाही. त्यामुळे यंदा जोपर्यंत सरसंघचालक प्रयाग तीर्थी जात नाही आणि कुंभ स्नान करत नाही तोपर्यंत आपण थांबले पाहिजे. आपण त्यांच्या मार्गाने जायला पाहिजे असे आमचे ठरले होते. पण ते गेले नाहीत, म्हणून आमचा कार्यक्रम होऊ शकला नाही. त्यामुळे शिदेंनी नागपूरला जाऊन एक पत्रकार परिषद घ्यावी आणि सरसंघचालकांना विचारावे की आपण हिंदू आहात, आपण कुंभला का गेला नाहीत? त्यानंतर आमच्याकडे यावे’, असेही राऊत म्हणाले.