महाविकास आघाडीमध्ये मोठे घमासान बघायला मिळतंय. संजय राऊत यांच्या विधानानंतर विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. संजय राऊत यांनी स्वबळाचे भाष्य केल्यानंतर कॉंग्रेसच्या नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या. दरम्यान पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेचा खरपूस शब्दांत समाचार घेतला.
संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस नेत्यांनी माझे विधान आधी नीटपणे ऐकावे. ऐकून घेण्याची सवय असली पाहिजे. काँग्रेस नेत्यांनी ऐकायची सवय ठेवावी. समोरच्याचे नीट ऐकणे मोठी गोष्ट असते. मी इतकेच म्हणालो होतो की, लोकसभा निवडणुकांसाठी इंडिया आघाडी स्थापन करण्यात आली होती. विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडी तयार करण्यात आली.
तसेच, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्ही स्वबळावर लढावे, ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची भावना आहे. आमचे निवडणूक चिन्ह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी तुटली असे मी कधीही म्हणालो नाही. केवळ आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना मांडल्या. त्यामुळे कुणालाही मिरच्या लागण्याचे कारण नाही. आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचा अधिकार सर्वांना असल्याचे स्पष्टीकरण देत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी काँग्रेस नेत्यांचे कान टोचले आहेत.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, गृहमंत्री म्हणत होते की कोणालाही सोडणार नाही. पण मुख्य आरोपीला सोडायचे आणि इतर आरोपींना धरायचे असे त्यांचे नेहमीचे धोरण आहे. वाल्मिकी कराड त्यांच्याच पक्षाचा आहे. त्यामुळे त्याला सोडले बाकी लोकांना कापले. छोट्या माश्यांना पडकले,तर मोठ्या माशाला सोडले आहे. तुमच्या पक्षाचे लोक देखील आक्रोश करत आहेत. तरीही तुम्ही बघत नाहीत. म्हणजे तुम्हाला त्यांना वाचवायचे आहे. असा घणाघातही खासदार संजय राऊतांनी केला आहे.