मुंबई । Mumbai
देशाच्या राजकारणात आणि गुन्हेगारी जगतात सध्या ‘लॉरेन्स बिश्नोई’ या नावाभोवती अनेक चर्चा रंगल्या आहेत. मात्र, याच नावाचा वापर करून देशात मोठा राजकीय गेमप्लान शिजवला जात असल्याचा अत्यंत खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रासह देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि गृह मंत्रालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. साबरमती मध्यवर्ती कारागृहात असलेला कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई हा देशातील अनेक राज्यांच्या पोलिसांना विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये हवा आहे. पंजाबमधील सिद्धू मुसेवाला हत्याकांड असो किंवा मुंबईतील बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण आणि सलमान खानच्या घरासमोरील गोळीबार असो अनेक प्रकरणांत विविध राज्यांचे पोलीस त्याच्या ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तरीही त्याला इतर पोलिसांच्या स्वाधीन का केले जात नाही? असा थेट सवाल त्यांनी विचारला.
संजय राऊत यांनी आरोप करताना म्हटले की, “म्यानमारसारख्या परदेशातून गुन्हेगारांना भारतात आणले जाते, मग देशातीलच एका तुरुंगात असलेल्या आरोपीचे ट्रान्झिट कस्टडी हस्तांतरण का रोखले जात आहे?” यामागे मोठे राजकीय हितसंबंध असल्याचा दावा करत ते म्हणाले की, बिश्नोई हे केवळ एक नाव असून त्याच्या नावाखाली राजकीय विरोधकांना लक्ष्य करण्याचे कटकारस्थान रचले जात आहे.
आगामी काळात देशात राजकीय घडामोडी वेग घेत असताना, विरोधकांवर हल्ले किंवा राजकीय नेत्यांच्या हत्या घडवून आणण्यासाठी या टोळीचा वापर केला जाऊ शकतो, अशी भीती राऊत यांनी व्यक्त केली. हा केवळ अंदाज नसून वस्तुस्थिती असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, बॉलिवूडवर नियंत्रण मिळवण्याचा आणि राजकीय दबाव तंत्र वापरण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्रातील सत्तांतरावर भाष्य करताना राऊत म्हणाले की, राज्यातील राजकीय उलथापालथ ही लोकशाही मार्गाने झालेली नसून, भीती आणि दबावाच्या जोरावर घडवून आणली गेली आहे. विरोधकांमधील वाढत्या नैराश्यातूनच अशा प्रकारच्या कारवायांना खतपाणी घातले जात असल्याचा टोला त्यांनी लगावला.



