मुंबई । Mumbai
आपल्या शिस्तबद्ध आणि कडक कार्यपद्धतीमुळे प्रशासकीय वर्तुळात ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भेसळयुक्त अन्न आणि अस्वच्छ हॉटेल्सविरोधात मोहीम उघडली आहे. त्यांच्या या धडक कारवायांचे राज्यभरातून कौतुक होत असतानाच, आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी तुकाराम मुंढे यांना थेट पत्र लिहून एकीकडे त्यांच्या कामाची प्रशंसा केली आहे, तर दुसरीकडे एफडीएच्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा पोलखोल करत खळबळजनक आरोप केले आहेत.
खासदार राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे की, मे २०२६ मध्ये पदभार स्वीकारल्यापासून मुंढे यांनी भेसळयुक्त दूध, बनावट (अॅनालॉग) पनीर, हॉटेलमधील अस्वच्छता आणि एक्स्पायरी साठ्यांवर घेतलेली कठोर भूमिका अत्यंत स्वागतार्ह आहे. मात्र, तुकाराम मुंढे यांच्या नावाचा आणि धाकाचा गैरफायदा घेऊन एफडीएचे काही भ्रष्ट अधिकारी हॉटेल व्यावसायिक, छोटे व्यापारी आणि क्विक-कॉमर्स कंपन्यांच्या गोदामांवर धाडी टाकून त्यांना ब्लॅकमेल करत आहेत. कारवाईच्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून लाखोंची वसुली सुरू असून वांद्रे येथील एफडीएचे कार्यालय या लुटीचे मुख्य केंद्र बनल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे.
पत्रात अधिकाऱ्यांच्या कथित वसुलीच्या ‘रेट कार्ड’चा उल्लेख करण्यात आला असून, ठाण्यातील एका प्रकरणात तब्बल १६ ते १८ लाख रुपयांची लाच उकळली गेल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. याशिवाय, मोठमोठ्या फार्मा कंपन्या सत्ताधारी पक्षांना हजारो कोटींच्या देणग्या देत असल्याने त्यांना ‘वरचा वरदहस्त’ मिळतो, तर दुसरीकडे लहान व्यावसायिकांना मात्र जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचे सांगत फार्मा क्षेत्रातील गैरप्रकारांकडेही त्यांनी लक्ष वेधले.
पत्राच्या शेवटी तुकाराम मुंढेंना टोला लगावताना राऊत म्हणाले, “जनतेचे आरोग्य नक्कीच महत्त्वाचे आहे, परंतु आरोग्याच्या नावाखाली अधिकाऱ्यांची सुरू असलेली ही वसुली म्हणजे थेट लूट आहे. त्यामुळे तुमचा हा ‘मुंढे इफेक्ट’ केवळ हॉटेल्सच्या किचनमध्येच नाही, तर एफडीएच्या वांद्रे कार्यालयातील तिसऱ्या मजल्यावरही दिसणे गरजेचे आहे.” आता संजय राऊत यांच्या या खळबळजनक आरोपानंतर आयुक्त तुकाराम मुंढे कोणती कठोर पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




