मुंबई । Mumbai
महायुतीला मिळालेल्या यशानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. मात्र, अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे विरोधकांकडून सत्ताधारी नेत्यांवर टीका करण्यात येत आहे.
यावरून विरोधी पक्षाचे नेते आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. असं असतानाच महाविकास आघाडीचे काही खासदार भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपा महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ राबवणार असल्याचंही बोललं जात आहे.
‘ऑपरेशन लोटस’च्या या चर्चांमुळे आघाडीच्या नेत्यांचे मात्र धाबे दणाणले आहेत. अशातच राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार पाडणार अशी जाहीर वक्तव्य करणारे शिवसेना ठाकरे गटाते खासदार यांनी देखील ‘ऑपरेशन लोटस’वर प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले, भाजपा कोणतेही ऑपरेशन लोटस करू शकते. कारण त्यांच्याकडे पैसा आणि यंत्रणा आहे. याआधीही अशा प्रकारे माणसे फोडलेले आहेत. एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांच्यासारखी माणसे का पळून गेले? भीती पोटीच गेले ना? ते पण ऑपरेशन लोटस नव्हते तर ऑपरेशन डर होते. त्यामुळे ते घाबरून तिकडे गेले.
तसेच, भाजपाबरोबर गेल्यानंतर त्यांची जप्त केलेली संपत्ती परत द्यायची. हे असे सुरु आहे. भाजपाच्या सत्तेकडे नैतिकता नावाचा कोणताही प्रकार नाही. आता २० दिवसानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसेल. गृहखाते कोणाकडे द्यायचे हे ठरत नसेल तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न गंभीर होत चालला आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.