मुंबई । Mumbai
राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून २१ दिवस झाल्यानंतर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला. नागपूरमधील राजभवनात पार पडलेल्या सोहळ्यात ३९ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. यात नव्या चेहऱ्यांनादेखील संधी देण्यात आली आहेत.
तर, दुसरीकडे मागील मंत्रिमंडळातून काहींना वगळण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धक्कातंत्राचा वापर करत छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळले. दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारावरून खासदार संजय राऊतांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. तसेच छगन भुजबळ यांच्यावर बोचरी टीका केली.
छगन भुजबळ यांना मंत्रिपदामधून वगळण्यात जातीय राजकारण आहे. छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची साथ सोडली. ती क्लेषदायक होती. ज्याला त्याला कर्माची फळ मिळतात, असा खोचक टोला राऊतांनी लगावला. झिरो टॉलरन्सचा विषय फडणवीस यांनी राज्यात राबवला तर ९० टक्के मंत्रिमंडळ खाली होईल, असे संजय राऊत म्हणाले.
तसेच विधानभनात आमचे विरोधी आमदार कमी आहेत, पण ते दमदार आहेत. आज पाहिला दिवस आहे. काही लोकांचे भिंतीवर टांगलेले कोट टाईट झाले. रवी राणा यांचं देखील मंत्रिपदासाठी नाव ऐकलं. ते देखील अमरावतीला गेले. जे आमच्याकडून गेले ते सत्ता, पद आणि पैशासाठी गेले हे स्पष्ट झालं, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
तानाजी सावंत, दीपक केसरकर यांनाही मंत्रिपदातून वगळण्यात आलं आहे, याबद्दल विचारल्यावर संजय राऊत यांनी म्हटलं, अडीच-अडीच वर्षांचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला असल्याचं मी ऐकलं आहे. खरे म्हणजे सहा-सहा महिन्यांचा फॉर्म्युला असता, तर सगळ्यांना मंत्रिपदे मिळाली असती. याचा अर्थ आहे, आमच्याकडील सोडून गेलेली लोक सत्ता, मोह आणि पैशांसाठी गेले. ज्यांच्या भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमतेचे आरोप होते, अशा अनेकांना वगळण्यात आलं आहे.